महाबळेश्वर 'पोक्सो'त ११ सहआरोपी डी. एम. बावळेकरांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा
मिलिंद लोहार-सातारा
महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर गुरुवारी या घटनेला आणखी गंभीर वळण लागले. महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांच्या दोन्ही मुलांसह ११ जणांना सहआरोपी करण्यात आले. त्यांच्यावर गुरुवारी गुन्हा दाखल झाला. संशयितांमध्ये एका वकीलाचाही समावेश आहे. एकूण १३ जणांचा संशयितांमध्ये समावेश असून अटक केलेल्या दोन्ही मुख्य संशयितांना दि. २७ पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही प्रतिष्ठितांची नावे समोर येणार असून त्यादृष्टीने पोलिस या प्रकरणाच्या मुळापर्यंत गेले आहेत. डी. एम. बावळेकर यांचे पुत्र सनी ऊर्फ सत्वित दत्तात्रय बावळेकर, योगेश दत्तात्रय बावळेकर (दोघे राहणार महाबळेश्वर ) तसेच आनंद हिरालाल चौरसिया, सुनील हिरालाल चौरसिया, पूनम सुनील चौरसिया (तिघे रा. कांदिवली, मुंबई), संजयकुमार जंगम, मंजूर रफिक नालबंद (दोघे रा. महाबळेश्वर), अनुभव कमलेश पांडे (रा. उत्तर प्रदेश, सध्या महाबळेश्वर), घनश्याम फरांदे (रा. तामजाईनगर सातारा), अॅड. प्रभाकर रामचंद्र हिरवे महाबळेश्वर) व अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबातील एका सदस्यावर गुरुवारी गुन्हा दाखल झाला. यापूर्वी सागर ऊर्फ आबा हनुमंत गायकवाड (वय ३०) व आशुतोष मोहन बिराम (२२, रा. मुन्नवर हौ. सोसा, महाबळेश्वर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने दि. २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. दत्तक देण्यात सहभागी असलेले अॅड. प्रभाकर हिरवे व धार्मिक विधीचे पौराहित्य करणारा संजयकुमार जंगम या संशयितांनाही गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.
अर्भक दत्तक दिले की विकले? या प्रकरणाला दिवसेंदिवस गंभीर वळण लागत आहे. अनेक प्रतिष्ठितांची नावे समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांना आणखी खोलात जाऊन सर्व संशयितांचे बुरखे फाडण्याचे आव्हान आहे. चौरसिया कुटुंबीयांना नवजात बालकास दत्तक देण्याच्या प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाला आहे का? झाला असेल तर त्याचे स्वरूप काय? बाळ दत्तक म्हणून दिले की त्याची विक्री करण्यात आली? या बाबीही समोर येणे गरजेचे आहे, या अनुषंगाने देखील पोलिस तपास करत आहेत.
योगेश बावळेकरवर दुसरा गुन्हा... माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांचे सुपुत्र योगेश बावळेकर याच्यावर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात यापूर्वी अश्लील चित्रफिती व फोटो व्हॉटस् अॅप ग्रुपवर टाकल्यामुळे त्याच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणांमध्ये आता दुसरा 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने महाबळेश्वरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.