माणसा कधी जागा होशील?
विशेष लेख
मिलिंदा पवार
.
गेली सांगून ज्ञानेश्वरी
जरा जपून चाल ग पोरी
माणसा परीस मेंढर बरी
माणसा परीस मेंढर बरी
माणसा माणसा कधी होशील तू माणूस अशी म्हणायची वेळ आली आहे कोणाला कोणाच्या समस्यांशी देणघेण राहिले नाही. जो तो आपापल्या जगण्यामध्ये, कामांमध्ये गुंतून आहे .
शेजाऱ्यांशी ,जगाशी त्याचे देणेघेणे नाही असे चालले आहे पण हे सर्व कुठपर्यंत जोपर्यंत समस्या प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मग आपल्याला समस्या आल्या की माणूस जागा होतो त्याच्याबद्दल बोलतो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते ना वो !मग काय करायचं ?
गेली काही दिवस टीव्हीला, पेपर मध्ये येणाऱ्या बलात्काराच्या घटनांनी मन सुन्न झाले आहे व चीड येऊ लागली आहे माणूस एवढ्या खालच्या पातळीला कसा जाऊ शकतो हेच समजेनासे झाले आहे. लहान मुली- ते , म्हाताऱ्या बाई पर्यंत ही विकृती कोणालाही सोडत नाहीत आपल्या आया-बहिणींची अब्रू वेशीवर टाकताना यांना लाज कशी वाटत नाही.
आम्ही स्त्रीयांनी आमच्या मुलींनी बाहेर पडावे की नाही हे प्रश्न प्रत्येक स्त्रीला सतावू लागला आहे प्रत्येक आईला त्याच्या मुलीविषयी काळजी वाटू लागली आहे .
21 वे शतक असूनही ज्या स्त्रीने उंबरठा ओलांडून आपले कर्तृत्व सिद्ध केले तिच्यावर ही वेळ का यावी याचा विचार सर्वांनी करावा याला जबाबदार कोण आणि या सर्व गोष्टीतून निष्पन्न काय होणार खरंच खूप भयानक थरकाप उडवून देणारी परिस्थिती आहे ही सर्व.आतापर्यंत किती तरी निर्भया आपल्या समोर आल्या ते किस्से असे आहेत जे समोर मांडायचे तर काळजाचा थरकाप उडतोय माझ्या. पण ज्या स्त्रीने त्या कोवळ्या मुली ने हे सहन केले त्याची काय परिस्थिती होत असेल हे सांगणे कठीणच .
आताचा काळ कठीण आहे हे म्हणणे जर योग्य असले तरी समाजात चांगले आणि वाईट दोन्ही प्रवृत्तीची पुरुष मंडळी आहेत तशाच स्त्रियादेखील आहे जर प्रश्न संस्काराचा असेल तर आई-वडिल मुलांवर असे संस्कार करत नसतात .असं कोणत्या आई-वडिलांना वाटेल की आपल्या मुलाने वाईट मार्गाला जावे. मग चुकतय कुठे? मुलांची संगत चुकीचे आहे का ?बाहेर कुठे जात आहेस कोणाशी बोलता त्याच्यावर आपले नियंत्रण नाही का? का मोबाईलचा अतिवापर होतोय? नक्की होतय काय हा प्रश्न प्रत्येक जबाबदार पालकांनी स्वतः ला केला पाहिजे .
स्त्रीचा आदर राखायला घरातूनच शिकवले पाहिजे जर तुम्ही स्वतः बायकोला, आईला, बहिणीला, मुलीला आदर नाही दिला तर मुलेही तेच शिकणार. अनुकरणातून मुल शिकत असतात आणि हल्लीची मुल आपल्या आई-वडिलांचे अनुकरण बघत असतात व त्यातूनच त्यांना संस्कार व शिकवण भेटत असते. हे वेगळे सांगायला नको. समाजातील या विकृतीला कसे संपवायचे हा मोठा प्रश्नच आहे. कायद्याचा धाक असूनही अशा माणसांना कायदे म्हणजे काहीच वाटत नाही का? ही विकृती का वाढते आहे का निर्माण होते याचे विचारमंथन करणे खरेच गरजेचे आहे .
कोरोनामुळे अनेकाच्या नोकऱ्या गेल्या माणसे बेरोजगार झालेले कित्तेक मुली मुले अनाथ झाले घरात बसून बसून माणसांना मानसिक आजारांना व शारीरिक आजारांना सामोरे जावे लागत असेल तरीही प्रत्येकाने आपली सद्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून वागावे तसेच' रिकामे डोके सैतानाचे घर' या म्हणीप्रमाणे न वागता जास्तीत जास्त व्यायाम, ध्यानधारणा, पुस्तक वाचन, ग्रंथ वाचन ,नामजप या गोष्टीमध्ये रमवावे व आपल्या विचारांना चांगल्या प्रकारे सकारात्मक विचारांनी पोषित करावे नाहीतर अनेक मनोरुग्णांची वाढ होईल . व यामुळे माणूसच माणसाचा शत्रू होईल यात शंका नाही.
तेव्हा सर्व सजग मानव जातीलाच आवाहन आहेत कृपया सर्वांनी सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवा आपल्या सभोवताली काय चालले आहे याकडे लक्ष ठेवा वाईट गोष्टींना वेळीच आळा घाला व चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन द्या नाहीतर हे सर्व आपल्याला ऱ्हासा कडे घेवून जाईल यात शंकाच नाही .
ही आपल्या शिवबांची भूमी आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमी आहे आले अहिल्याबाई होळकर या स्त्रियांच्या कर्तुत्वाने पावन झालेली भूमी आहे कितीतरी स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे पी टी उषा, कल्पना चावला, मीराबाई चानू, लता मंगेशकर, मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने या भूमीला पावन केले आहे असे स्त्रियांवरील होणारे अत्याचार कितपत योग्य आहे सांगा ना.
स्त्री म्हणून आम्ही सबला आहोत हे केव्हाच सिद्ध केले स्त्रीने तरीही मग तुमचा तआमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलत नाही? आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे आम्हीही माणसंच आहोत हे अजून किती दा तुम्हाला सांगावे लागेल सांगा ना. जर स्त्रीच नसेल तर पुरुषाच्या अस्तित्वालाही काही अर्थ नसेल व जर स्त्री नसेल तर पुरुष जन्माला येणार नाही हे सत्य समजत असूनही जर स्त्रियांना त्रास होत असेल तर स्त्री ही मागे पडणार नाही लक्षात ठेवा जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई यांचा इतिहास असलेल्या देशात आम्ही देखील जशा शास्त्रात पारंगत आहोत तश्याच शस्त्रात देखील पारंगत होऊन शस्त्र घ्यायला मागेपुढे पाहणार नाही. हे नक्की ! पण जर दहा-बारा जण एका मुलीवर मर्दुमकी दाखवत असाल तर त्यासारखी लाजिरवाणे आणि नीच कृत्य केल्याबद्दल तुमच्या आईला ही तुमची लाज वाटली असेल हे नक्कीच! तेव्हा विकृत माणसांनो जागे व्हा. स्त्रीला आदराने सन्मानाने वागवा नाहीतर हयाच स्त्रीला दुर्गेचे रूप
घ्यायलाही वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा.