उमदीत ओढा पात्रात बुडून दोघी बहिणींचा मृत्यू लहान भाऊ बचावला
उमेश पाटील -सांगली
उमदी ता.जत येथे ओढा पात्रात पोहायला गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. कु.रेणुका शिवानंद ऐवळे (वय -७) व कु.लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय-११) अशी दुर्दैवी बहिणींची नावे आहेत. तर त्याच्या सोबतच पोहायला गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे (वय-६) हा बचावला गेला.
अधिक माहिती अशी की, ऐवळे कुटुंबिय हे काही दिवसापासून उमदी गावात ओढ्यालगत असणाऱ्या आपल्या घरात रहात होते. तसेच मोलमजुरी करून ऐवळे कुटुंब घर चालवतात.. आज रविवारी सकाळी घरातील सर्व लोक दुसऱ्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. घरात दोन मुली व एक मुलगा यांना घरात सोडले होते. दुपारी आंघोळ करण्यासाठी दोन्ही बहीणी व एक भाऊ असे तिघे मिळुन वडापात्रात आंघोळी करण्यासाठी गेले . परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने रेणुका शिवानंद ऐवळे (वय-७) व लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय-१२) या दोन्ही सख्ख्या बहीणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचवेळी त्यांच्या सोबतच गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे (वय-६) याने दोन्ही बहीणीला पाण्यात बुडताना पाहून आरडाओरडा सुरू केला.
त्यावेळी ओढ्यालगत जनावरे राखणारा संभाजी माने व प्रकाश वाघमारे यांनी मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारून बाहेर काढले परंतु दुर्दैवाने मुलींचा मृत्यू झाला होता. तर लहान भाऊ मायप्पा यास वाचवण्यात यश आले. या घटनेने उमदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.