केंद्रीय पथक करणार दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी!
जिल्हा प्रशासनाने केलेली कार्यवाही तसेच दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन याची ही घेणार माहिती
अमूलकुमार जैन-अलिबाग
केंद्र शासनाकडून हे आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथक दोन दिवसाच्या पाहणी दौऱ्यावर आले असून रायगड जिल्ह्यामधील दिनांक 22 जुलै 2021 रोजी महाड येथे आलेला महापूर, महाड तालुक्यातील तळीये तसेच पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी आणि केवनाळे येथे झालेले भू:स्खलन व दरड कोसळून झालेली दुर्घटना, या परिस्थितीबाबतचा अभ्यास करण्यासाठी, या दरम्यान आलेल्या अडचणींचा मागोवा घेण्यासाठी व त्यावर काय उपाययोजना करता येतील, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी हे केंद्रीय पथक प्रत्यक्ष दुर्घटनास्थळी जाऊन पाहणीदेखील करणार आहेत.
केंद्रीय वित्त मंत्रालयाचे संचालक श्री.अभेयकुमार, केंद्रीय कृषी,सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ.सुभाष चंद्रा, केंद्रीय ग्रामीण विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त आयुष पूनिया हे या पथकाचे सदस्य असून या बैठकीस कोकण विभागीय आयुक्त श्री. विकास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील उपवनसंरक्षक श्री. आप्पासाहेब निकत, कार्यकारी अभियंता श्री. सुखदेवे, उपसंचालक पशुसंवर्धन डॉ.सुभाष मस्के, जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. बंकट आर्ले, उपसंचालक श्री.बोराडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त श्री.सुरेश भारती, रोहा उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसिलदार कविता जाधव, तहसिलदार विशाल दौंडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच इतर विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.