पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिला कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या 18 बालकांना मायेचा हात
अमूलकुमार जैन-अलिबाग
पाच लाख रुपयांच्या मुदत ठेव प्रमाणपत्राचे केले वितरण तसेच "बाल संगोपन" व " 1% आरक्षण अनाथ प्रमाणपत्र" योजनेचा दिला लाभ
कोव्हीड19मुळे आई वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या भवितव्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. रायगड जिल्ह्यातील अशा 18 अनाथ बालकांना एकरकमी पाच लक्ष रुपयांच्या मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण आज पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित शासकीय क्रीडा संकुल, पाली येथील कार्यक्रमात करण्यात आले.
करोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालकांना "अर्थसहाय्य योजना" या योजनेंतर्गत दि.1 मार्च 2020 रोजी किंवा त्यानंतर करोना संसर्गामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक (आई व वडील) हे मृत्यू पावलेले आहेत, अशा 0 ते 18 वयोगटातील बालकांना, दि. 1 मार्च 2020 रोजी किंवा त्यानंतर एका पालकाचा (आई किंवा वडील) कोविड-19 मुळे तर एका पालकाचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास अशा 0 ते 18 वयोगटातील बालके, दि.1 मार्च 2020 पूर्वी एका पालकाचा (आई किंवा वडील) मृत्यू झाला असेल आणि दि. 1 मार्च 2020 किंवा त्यानंतर एका पालकाचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला असल्यास अशा 0 ते 18 वयोगटातील बालके अशा बालकांकरिता त्या बालकाच्या नावे एकरकमी पाच लक्ष रुपये इतकी रक्कम मुदत ठेव म्हणून जमा करण्याची ही योजना आहे.
या योजनेतर्गत ही एकरकमी मुदत ठेव रक्कम संबंधित बालक व जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या नावे असणाऱ्या सामायिक बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
अशा एकूण 18 बालकांना मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण आज पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
अशाच प्रकारे जी बालके कोविड-19 संसर्गामुळे अनाथ झाली आहेत, अशा बालकांचे संगोपन करण्यासाठी त्यांचे नातेवाईक इच्छुक असतील तर अशा बालकांना "बालसंगोपन" योजनेनुसार प्रति बालक प्रति महिना 1 हजार 100 रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. तसेच एक पालक (आई किंवा वडील) मयत झालेल्या बालकांना देखील बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे अनाथ बालकांना 1% आरक्षण अनाथ प्रमाणपत्र ही योजना देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. पूर्णतः अनाथ असलेल्या बालकांचा ज्यांच्या आई-वडील, भाऊ-बहीण, जवळचे नातेवाईक, गाव, तालुका, त्यांचा पत्ता याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही आणि त्या बालकांचे पालन पोषण बालकांच्या काळजीसाठी कार्यरत संस्थेत वा अनाथालयात झाले आहे, अशी बालके, तसेच ज्या बालकाच्या आई-वडीलांचे निधन झालेले आहे तथापि त्यांच्या नातेवाईकांबाबत माहिती उपलब्ध असून त्यांच्या कागदपत्रावर जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या बालकांचे पालन-पोषण बालकांसाठी कार्यरत संस्थेत वा अनाथालयात झाले आहे अशी बालके, त्याचप्रमाणे ज्या बालकाच्या आई वडिलांचे निधन झालेले आहे परंतु त्या बालकाचे इतर नातेवाईक जिवंत असून बालकाचे संगोपन नातेवाईकांमध्ये झालेले आहे,त्या बालकांच्या जातीबाबतची माहितीही उपलब्ध आहे,अशी बालके यांना "अनाथ बालकांना 1% टक्के आरक्षण अनाथ प्रमाणपत्र" या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो.
करोना संसर्गामुळे रायगड जिल्ह्यातील ज्या बालकांचे दोन्ही पालक (आई आणि वडील) मृत्यू पावलेले आहेत, अशा 0 ते 18 वयोगटातील एकूण 13 बालकांना अनाथ 1% टक्के आरक्षण प्रमाणपत्र आज पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे या बालकांविषयी दुःख व्यक्त करताना म्हणाल्या की, कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या उत्तम शिक्षणासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आणि शासन म्हणून निश्चितच योग्य ती जबाबदारी घेण्यात येईल. येणाऱ्या काळात या बालकांच्या लसीकरणाची मोहिमही घेणार आहोत. भविष्यात या बालकांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास पालकमंत्री या नात्याने या बालकांना आवश्यक ती मदत करण्यास मी नेहमीच तत्पर असेन.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख, पंचायत समिती सभापती रमेश सुतार, महिला व बालविकास सभापती श्रीमती गीताताई जाधव, रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, पाली तहसिलदार दिलीप रायण्णावार, रोहा तहसिलदार कविता जाधव, पाली गटविकास अधिकारी वसंत यादव, रोहा गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, रायगड ग्रामीण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, श्रीमती गीता पारलेचा, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील, पाली नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीम.अंगाई साळुंखे, योगीराज जाधव, राजेश म्हपारा तसेच लाभार्थी, ग्रामस्थ हे उपस्थित होते.