साताऱ्यात खोट्या आरटीजीअसद्वारे आयडीबीआय बँकेस साडेचार लाखांचा गंडा
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतीक मिसाळ सातारा
दुचाकी वितरक बोलत असल्याचे सांगत ईमेलद्वारे आरटीजीएस रीक्वेस्ट पाठवत सातारा येथील आयडीबीआय बँकेस ४ लाख ६० हजारांना गंडा घातल्याप्रकरणी एका मोबाईल क्रमांक धारकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे . याची तक्रार बँकेच्या वतीने अजित मोहन धायगुडे ( रा . अहिरे , ता . खंडाळा ) यांनी नोंदवली आहे . अजित धायगुडे हे पोवई नाका येथील आयडीबीआय बँकेत कार्यरत असून , ता . २ ९ रोजी दुपारी एकाने त्यांच्याशी संपर्क साधत आपण साताऱ्यातील प्रसिद्ध दुचाकी वितरक असल्याचे भासवत संभाषण केले . हे करतानाच त्या अज्ञाताने दोन आरटीजीएस पाठवायचे असल्याचे सांगितले . याचवेळी त्या अज्ञाताने दुचाकी वितरकाच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या मेलवरून आरटीजीएस करण्यासाठीची रीक्वेस्ट पाठवली . यात पंजाब नॅशनल बँकेतील मैसर रझा यांच्या खात्यात ९ लाख ९ ० हजार , तसेच अॅक्सिस बँकेच्या चरणजित सिंग यांच्या खात्यात ८ लाख १४ हजार पाठविण्यास सांगितले .
बँकेने त्याबाबतची खात्री करून आरटीजीएस रिक्वेस्टनुसार १८ लाख १५ हजार ६०० रुपये दोन्ही बँकेतील खात्यात वर्ग केली . दैनंदिन कामकाजा दरम्यान संशय आल्याने बँकेने शहानिशा केली . यावेळी त्यांच्या संबंधित दुचाकी वितरकाने अशी कोणतीही आरटीजीएस रिक्वेस्ट न पाठविल्याचे लक्षात आले . यानंतर आयडीबीआय बँकेने संबंधित बँकांशी संपर्क साधत दोन्ही बँक खात्यातील रोकड गोठविण्याच्या सूचना केल्या . रोकड गोठविण्याची प्रक्रिया होईपर्यंत संबंधितांनी त्यातील ४ लाख ६० हजारांची रोकड काढून घेतली होती . खोटी आरटीजीएस रिक्वेस्ट पाठवत बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी एका मोबाईल क्रमांक धारकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात काल गुन्हा नोंदविण्यात आला . याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे करीत आहेत .