कुसुंबळे ग्रामपंचायत कार्यालयाचे रविवारी उद्घाटन
खा. सुनील तटकरे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या भाषणाकडे जिल्हय़ाचे लक्ष; महाविकास आघाडीची जिल्ह्यातील रणनीती स्पष्ट होणार!
अमूलकुमार जैन-अलिबाग
शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या कुसुंबळे ग्रामपंचायतीचे कार्यालय नव्या भव्य आणि सुसज्ज अशा इमारतीमध्ये सुरु होत आहे. नव्याने बांधलेली ग्रामपंचायत इमारत, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहाचे उद्घाटन रविवार, 31 ऑक्टोबर रोजी रायगडचे खासदार सुनिल तटकरे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते होत आहे. अनेक वर्ष शेकापच्या ताब्यात असलेली कुसुंबळे ग्रामपंचायत ५८ वर्षानी शिवसेनेने हिसकावून घेतल्यानंतर विविध विकास कामे राबवून पुर्णत्वास नेली, याची पोटशुल उठलेल्या शेकापच्या नेत्यांनी नुकतेच शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये फुट पाडण्याचा अपयशी प्रयत्न करत काही आरोप केले होते. या आरोपांना शेकापच्या बालेकिल्ल्यात खा. सुनील तटकरे आणि आ. महेंद्रशेठ दळवी कोणते उत्तर देणार याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार महेंद्र दळवी शिवसेना अलिबाग तालुकाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या कुर्डुस मतदार संघात मजबूत मोर्चेबांधणी केलेली आहे. जे शेकापला अनेक वर्षात करता आलेले नाही, ते शिवसेनेने अगदी अल्पकालावधीत करुन दाखवले. याचे पडसाद आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये दिसणार असल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. याचमुळे शेकापची नेतेमंडळी काही दिवसांपासून तथ्यहीन आरोप करीत आहेत, कार्यकर्त्यांना सातत्याने धमकावले जात आहेत, शेकापचे नेते अगदी वैयक्तिक पातळीवर अर्थहीन टिका करीत असतानाही येथील जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे, असे म्हणणे राजा केणी यांचे आहे. कोणतीही कामे न करता फक्त श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेकापच्या आरोपांना खा. सुनील तटकरे कोणत्या पद्धतीने उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्याचबरोबर आ. महेंद्रशेठ दळवी हे देखील अनेक दिवसांने जाहिर कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. शेकापच्या आरोपांना उत्तर देण्याची नामी संधी महेंद्रशेठ दळवी यांना मिळाली आहे. त्यामुळे रविवारच्या कार्यक्रमाकडे संपुर्ण जिल्हाचे लक्ष लागून राहिले आहे. या उद्घाटन समारंभासाठी जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना नेते विजय कवळे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव अॅड. प्रविण ठाकूर,रायगड जिल्हा परिषदेच्या गटनेत्या मानसीताई दळवी कामगार नेते दीपक रानावडे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग- मुरुड विधानसभा संघटक सतिश पाटील, पनवेल महापालिका नगरसेविका राजश्री वावेकर, रायगड जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा अॅड. श्रद्धा ठाकूर, अलिबाग तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष दत्ता ढवळे, अलिबाग तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष योगेश मगर, राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका उपाध्यक्ष जयेंद्र भगत उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सर्वांनी उपस्थित रहावे असे कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिना लोभी, उपसरपंच रसिका केणी, ग्रामसेवक गणेश म्हात्रे यांनी कळविले आहे.