पुराच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर रेल्वेला एकही काम करू देणार नाही
आमदार महेंद्र थोरवे यांचा सज्जड इशारा
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
'कर्जत - पनवेल रेल्वे लाईन टाकल्यापासून या परिसरातील शंभरच्या वर कुटुंबांना दर पावसाळ्यात जीव मुठीत धरून रहावे लागते. पावसाळ्यात तीन - चार वेळा पाणी येत असल्याने या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. या परिसरातील पुराच्या पाण्याचा प्रश्न मध्य रेल्वे प्रशासनाने सोडविला नाही तर रेल्वेचे एकही नियोजित काम करू देणार नाही. प्रसंगी संपूर्ण तालुका आंदोलनात सहभागी होईल.' असा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना दिला.
कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ज्ञानदीप वसाहती मध्ये कर्जत - पनवेल रेल्वे लाईनमुळे नेहमीच पुराचे पाणी येते. गेली पंधरा - सोळा वर्ष या पाण्याचा बंदोबस्त करावा म्हणून येथील रहिवासी मध्य रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करीत होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर हा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी हाती घेतला आणि त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे विविध माध्यमातून पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात रेल्वे प्रशासनाचे संबंधित अधिकारी पाहणीसाठी आले. त्यावेळी तेथील रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. तरीही ठोस उपाय योजना होत नव्हती. नंतर ओसवाल यांनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला आणि रेल्वे प्रशासनाने सभा आयोजित केली. रेल्वेचे अधिकारी अनिल हिवाळे यांनी रहिवाशांच्या समस्या समजावून घेण्यासाठी सभेत उपस्थिती दर्शविली.
ज्ञानदीप वसाहतीतील महेंद्र देशमुख यांच्या निवासस्थानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, पंकज ओसवाल, किरवलीचे सरपंच संतोष सांबरी, माजी उपसरपंच बिपीन बडेकर, पंकज पाटील, नगरसेवक संकेत भासे, अनिल व्हजगे, राहुल वैद्य, केतन बोराडे, राजेश जाधव आदींसह रहिवासी उपस्थित होते. लीना गुजराथी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. अपर्णा फडके आणि निखिल गवई यांनी दृक्श्राव्य पद्धतीने पूर परिस्थिती व त्यावर काय उपाय करायला हवेत? ते अगदी अभ्यासपूर्ण सादर केले.
या परिस्थितीची वेळो वेळी पाहणी करून यावर ठोस उपाय करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आमदार महेंद्र थोरवे यांनी 'उगाचच वेळ न घालवता भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही त्यासाठी रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर उपाय योजना करावी. अन्यथा आम्हाला वेगळे पाऊल उचलावे लागेल.' असा इशारा दिला. त्यावर पाण्याचा निचरा लवकर होऊन वसाहतीत पाणी शिरणार नाही यासाठी पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविल्याचे हिवाळे यांनी सांगितले. ओसवाल यांनी 'हा प्रस्ताव मंजूर होऊन काम कधी सुरू होणार?' असा प्रश्न उपस्थित केल्यावर मात्र अधिकारी वर्गाने रेल्वे बोर्डाकडे बोट दाखवले. 'याबाबत रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यां समवेत बैठक लावावी. त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे आणि येथील रहिवाशांचे शिष्टमंडळ यांची उपस्थिती राहील. रेल्वे हद्दीच्या बाहेरील कामासाठी मी निधी उपलब्ध करून देईन.' असे आमदार थोरवे यांनी सूचित केले. याप्रसंगी वसाहतीतील बहुसंख्य रहिवासी उपस्थित होते.
पूरपरिस्थिती बाबत बैठकीत इशारा देताना आमदार महेंद्र थोरवे सोबत पंकज ओसवाल, अनिल हिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.