आष्ट्यात नाल्यात स्कूल व्हॅन कोसळली:बारा विद्यार्थी जखमी
उमेश पाटील -सांगली
आष्टा येथील क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूलची टाटा मॅजीक व्हॅन पाच ते सात फूट नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात बारा चिमुकले विद्यार्थी- विद्यार्थींनी जखमी झाले. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास आष्टा येथील मिरजवेस जवळ ही दुर्घटना घडली. या घटनेची नोंद आष्टा पोलिस ठाण्यात झाली असून पोलिसांनी व्हॅन चालकांवर गुन्हा नोंद केला आहे.
याबाबबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, आष्टा ते मर्दवाडी जाणार्या रोडला मिरजवेस कडुन पिवळया रंगाची टाटा मॅजीक कंपनीची स्कुल व्हॅन भरधाव वेगात आली. त्यावेळी त्यावरील चालकाने कॅनॉलवरील एस क्रॉस पुलावरील संरक्षक दगडास जोरात धडक दिल्याने व्हॅन नाल्यामध्ये कोसळली. त्यावेळी व्हॅनमध्ये बसलेल्या मुलांनी आरडाओरड चालू केली. यावेळी अभय राजकुमार चौगुले, अभिजित आप्पासो सरडे, सुशांत बाबासो मुळे, बापुसो नेमीनाथ चौगुले,बाबासो सुभाष चौगुले
असे पळत व्हॅनजवळ आले. सर्वांनी नाल्यात उतरुन व्हॅनमधील लहान मुलांना व मुलीना बाहेर काढले.
या अपघातात प्रियंशी संदिप फडतरे वय 11 वर्षे रा. तुंग ता मिरज हिला उजव्या खांदयाला फॅक्चर झाले. शरन्या प्रफुल्लकुमार खोत वय 5 वर्षे इयत्ता
रा. मिरजवाडी हिला डावे हाताचे मनगटाजवळ मार लागला आहे. नंदिनी प्रविणकुमार गायकवाड वय 7 वर्षे रा. आष्टा हिला डोक्याला मुक्कामार लागला. मनस्वी रविंद्र नलवडे वय 7 वर्षे हिचे
डावे हाताचे मनगटाला व कमरेला मुकामार लागला आहे. तसेच 7 इतर मुलंना डोक्याला हाताला पायाला मुकामार लागला आहे. तसेच विद्यार्थ्यांसोबत असलेल्या मावशी वैशाली राजेद्र झिनगे यांना ही हातापायास खरचटुन मुकामार लागला. व्हॅन चालक ओंकार जयवंत घेवदे रा. अंकलखोप ता. पलुस याच्याही हातापायास मुकामार लागल्याने तो जखमी झाला.
सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. दरम्यान घटनास्थळी आष्टा पोलिसांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. या अपघाताने पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात अभय चौगुले यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी व्हॅन चालक ओंकार जयवंत घेवदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.