लाडीवली गावासह आदिवासी वाड्यांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.
अमूलकुमार जैन-अलिबाग
- मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयाला केराची टोपली दाखवणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते आणि ग्रामपंचायत गुळसुंदे सरपंचांवर कारवाई करण्याची मागणी.
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, या गावांसह डोंगरीची वाडी, स्टेशनवाडी, फलाटवाडी, चिंचेचीवाडी ह्या आदिवासी वाड्यांतील नागरिकांना मागील १२ वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे ५२ वर्ष जुन्या व नादुरुस्त व बंद पडलेल्या चावणे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे पाताळगंगा नदीतील प्रदूषित पाणी कोणत्याही जलशुद्धीकरण प्रक्रियेविणा पुरवठा केला जातो. तोही आठवड्यातून एक ते दोन वेळा फक्त अर्धा तास पाणी पुरवठा विभाग आणि ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशांनाही केराची टोपली दाखवून वरील निर्णयांबाबत कोणतीही कारवाई केलेली नसल्याच्या निषेधार्थ आज बुधवार दि.१७/११ /२०२१ पासून राष्ट्र सेवा दल संघटनेचे रायगड जिल्हा संघटक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लाडीवली येथील ग्रामस्थ रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले असून जोपर्यंत अकार्यक्षम अभियंते आणि सरपंचांवर कारवाई करून २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या निर्णयांवर प्रत्यक्ष कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.
अनियमित, अशुद्ध व जंतूंयुक्त पाणी पुरवठा प्रकरणी संबंधित गुळसुंदे ग्राम पंचायत सरपंच, रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे उप अभियंता, कार्यकारी अभियंता, पनवेल पंचायत समिती चे गटविकास अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करून होत नाही म्हणून दिनांक पंधरा मार्चला पनवेल पंचायत समिती पनवेलवर लाडीवली येथील महिलांनी हंडा मोर्चा काढूनही नागरिकांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने रायगडच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्याकडेही पत्रव्यवहार केला.
तरीही कोणताच मार्ग निघाला नाही म्हणून शेजारीच असलेल्या पाताळगंगा एम.आय. डी. सी. (MIDC) च्या योजनेतून पाणीपुरवठा करावा ह्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दल रायगड च्या वतीने मंगळवारी १३ जुलै २०२१ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या 'शिवतीर्थ' या कार्यालयावर मोर्चा काढण्याबाबतचे निवेदन देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने रा.जि. परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री. येझरे, पनवेलचे अभियंता श्री. सुनील मेटकरी खालापूर पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्री. इंगळे हे दिनांक १० जुलैला लाडीवली गावांत येऊन संघटना प्रतिनिधी व ग्रामस्थ प्रतिनधींच्या मागण्यांबाबत झालेल्या चर्चेतून मोर्चेक-यांच्या मागण्या मान्य करीत यापुढे शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करण्यात येईल, तसेच संबंधित सर्व गावे व आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याचे वेळापत्रकही लावण्यात येईल व महत्वाचे म्हणजे पाताळगंगा एम.आय.डी. सी. कडून चावणे गावाजवळ नवीन टॅपिंग घेऊन जल जीवन मिशन योजनेची जिल्हास्तरीय व प्रादेशिक स्तरावरील प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील ४ महिन्यात नवीन योजनेतून शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे लेखी पत्र संतोष ठाकूर, जिल्हा संघटक, राष्ट्र सेवा दल रायगड यांना देत दि.१३/०७/२०२१ रोजी रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथिल कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्याची विनंती केली होती.
त्यानुसार निष्क्रिय व्यवस्थेला अजून एक संधी दयावी म्हणून तेरा जुलै रोजी चा मोर्चा काही दिवसांसाठी तात्पुरता स्थगीत करीत यापुढे अनियमित, अशुद्ध व जंतूंयुक्त पाणी पुरवठा झाल्यास व पुढील ४ महिन्यांत उपरनिर्दिष्ट योजना कार्यान्वित न झाल्यास कोणतीही सूचना न देता संबंधित रा.जि. परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेची असल्याबाबत कळवून देखील आज पर्यंत सदर गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी निघाला नसल्याने, अखेर नाईलाजास्तव शुद्ध व नियमित पाणी पुरवठा न करणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा समिती गुळसुंदे, ग्रामविकास अधिकारी ग्रुप ग्राम पंचायत गुळसुंदे यांची चौकशी, करून व ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता व कर्मचारी यांचेवर कारवाई करून जल जीवन मिशनमधून प्रस्तावित योजनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी सोमवार दि.२५ ऑक्टोबरला रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा नेल्यानंतर मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ, जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. येझरे उप अभियंता वेंगुरलेकर, सुनील मेटकरी यांच्यासोबत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
या बैठकीत
- गुळसुंदे व लाडीवली (अकुलवाडी) गावांकडे जाणाऱ्या जलवाहिनीवर जल मापक मिटर बसवणे.
चावणे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर तात्काळ दोन मजूरांची नेमणूक करणे.
जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी सोडण्याबाबतचे वेळापत्रक संबंधित गावांना देणे.
चावणे जलशुद्धीकरण केंद्र येथील TCL व आलम रजिस्टर नियमित ठेवणे व पाणी प्रक्रिया करणे.
गुळसुंदे व लाडीवली (अकुलवाडी) गावांकडे जाणाऱ्या पाईप लाईनवर व्हॉल्व बसविणे, चेंबर व लॉकिंग व्यवस्था करणे.
बीपीसीएल डिंपल ड्रम्स आणि लोना इंडस्त्रीज कंपन्यांना सी एस आर निधीमधून सॅन्ड फिल्टर बसविण्यासाठी पत्र देणे.
तीन वर्षांपासून रखडलेल्या आमदार निधीमधून जलशुद्धीकरण केंद्र ते लाडीवली गावापर्यंतच्या पाईप लाईनचे काम तात्काळ पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करावे.
ज्या गावांमध्ये पाईपलाईन नाही अशा गाव आणि वाड्यांमध्ये जल जीवन मिशन मधून वैयक्तिक नळ जोडणी करून द्यावी.
तुराडे वावेघर व गुळसुंदे ग्रामपंचायतींकडे एमआय डीसीचे थकीत पाणीपट्टी भरण्यासंबंधीचे पत्र देणे.
गुळसुंदे ग्रामपंचायतीला एम.आय. डी. सी.कडून (नवीन नळ जोडणी) टॅपिंग देण्यासंबंधीचे पत्र देणे असे दहा निर्णय घेण्यात आले होते.