जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी स्वशिस्त आवश्यक- न्यायमूर्ती डी. के. भेंडे
राजेंद्र मर्दाने-चंद्रपूर
कोणतेही वाहन चालवताना अथवा प्रवास करताना अधिकार व कर्तव्यासह प्रत्येकाने कायद्याची किमान माहिती जाणून घेऊन स्वशिस्त अंगिकारल्यास जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविणे शक्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश - १ तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. भेंडे यांनी येथे केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या निर्देशानुसार वरोरा तालुका विधी सेवा समिती तर्फे ७५ वा ' आझादी का अमृतमहोत्सव ' अंतर्गत नगर परिषदेच्या सभागृहात ' मूलभूत कर्तव्याविषयी जागरूकता, मोटार अपघात प्रकरणांमध्ये भरपाई, त्याबाबत कायद्याची जनजागृती ' या विषयावर आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर वरोरा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) ए. जे. फटाले, उपविभागीय पोलीस अधिकारी ( भापोसे) आयुष नोपाणी, चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयकुमार साळुंखे, वरोरा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. मिलिंद देशपांडे, सचिव अँड. भावना लोया, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णरेखा पाटील, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अभिजीत मोटघरे उपस्थित होते.
न्यायमूर्ती भेंडे पुढे म्हणाले की, रस्ता अपघातात जख्मी झालेल्या व्यक्तिला त्याच्या हक्काची नुकसानभरपाई मिळविण्याचे सर्वाधिकार न्याय संस्थेने दिले आहे. न्यायालयाने मोटार अपघातात मिळणाऱ्या भरपाईचे सामान्य आणि विशेष भरपाई अशा दोन प्रकारात विभाजन केले आहे. नुकसानभरपाई प्राप्तीसाठी अधिकृत वाहन परवाना व वाहनाचा विमा आवश्यक असल्याने तशी मागणी करायला हवी. अन्य विम्यामध्ये कव्हरनोट ६० दिवसांचाच असतो यात विमाधारकाची फसगत होण्याची शक्यता आहे. एकीकडे मोटार वाहन विमा हे सर्व वाहन धारक चालकांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तावेज आहे. दुसरीकडे विना परवाना वाहन चालविले तर दंड होऊ शकतो पण दंडापेक्षाही परवाना नसेल आणि अपघात झाला तर आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते. अपघात प्रकरण न्यायालयात प्रविष्ट केल्यानंतर पंचनामा सोबत घटनास्थळाचा नकाशा / मॅप येणे महत्त्वाचे आहे. विमा व परवाना याचे महत्व विशद करताना त्यांनी ४ वर्षांपूर्वीच्या एका निकालाचा दाखला देत दस्तऐवज अभावी एका शेतकऱ्याची ऐपत नसतानाही प्रतिवादीने केलेल्या ९० लाखाच्या नुकसानभरपाई दाव्यात ४५ लाख रुपये देण्याचे आदेश सुनावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मोटार अपघात प्रकरणांमध्ये विमा, वाहन परवाना महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी विमा, परवाना तसेच मोटार अपघात प्रकरणांचे कायदे याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साळुंखे म्हणाले की, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणे, बेपर्वाईने गाडी चालविणे, सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या सुरक्षिततेच्या विचार न करणे या गोष्टी अपघाताला निमंत्रण देणाऱ्या असतात तर दुसरीकडे सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघातात मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वाहन चालविताना सावधानता बाळगली तर अपघात निश्चितच टाळता येतो. वाहतूक नियमांचे उत्स्फूर्तपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नोपाणी म्हणाले की, प्रत्येक व्यक्तिच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा आहे. कायदा पाळण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. हेल्मेटचा वापर न करणे, सीट बेल्ट न बांधणे, भरधाव गाडी चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणे, वळणावर ओव्हरटेक करणे आदी गोष्टी टाळाव्यात. प्रत्येकाने संवेदनक्षम होण्याची आवश्यकता आहे. एक लहानशी चूक साऱ्या कौटुंबिक सदस्यांना नेहमीसाठी नुकसानदायी ठरू शकते, हे विसरता कामा नये. वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी पोलिसांची सक्ती लोकहिताची असते, त्यामुळे त्यांच्यावर रागावू नये, असे त्यांनी नमूद केले.
अॅड. भावना लोया यांनी ' मोटार वाहन प्राधिकरण कायदा ' व सुवर्णरेखा पाटील यांनी ' मुलभूत कर्तव्याविषयी जागरूकता' याविषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात जेष्ठ विधिज्ञ, वकील मंडळी, न. प. कर्मचारीवृंद, पत्रकार व सुजाण नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रभारी अधीक्षक सपना बुचुंडे यांनी केले तर आभार डी. डी. ठावरी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानसी सकदेव, विश्वनाथ मडावी, वैभव आढाव इ.नी अथक परिश्रम घेतले.