इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरलेल्या बॅटऱ्यांचं करायचं काय? जगासमोर आव्हान!
ज्ञान-तंत्रज्ञान
अनुप ढम
मोबाईल, लॅपटॉप-टॅब्लेट अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीच सध्या सर्व वाहनांमध्ये वापरल्या जात आहेत. या बॅटरींना लिथियम आयन बॅटरी (lithium ion cell) म्हणतात. चारचाकी वाहनांमध्ये बसवलेल्या या बॅटरी 200-250 किमी प्रवास केल्यानंतर चार्ज कराव्या लागतात.
इलेक्ट्रिक वाहनांना (electric Vehicle) उत्तम दर्जाच्या बॅटरीची आवश्यकता असते. बॅटरी कमकुवत झाली तर वाहन तुम्हाला मध्येच धोका देऊ शकतं. परिणामी तुम्ही बॅटरी बदलणं आवश्यक होतं. मात्र, या बदललेल्या बॅटरींचं काय होतं? कारण, सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यात जुन्या बॅटऱ्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे.
अशा परिस्थितीत, जर वाहनांची बॅटरी उच्च कार्यक्षमतेच्या पातळीपासून 70-80 टक्क्यांपर्यंत आउटपुट देऊ लागली, तर ती बदलणे आवश्यक आहे. साधारणपणे, आठ ते दहा वर्षे चालल्यानंतर, वाहनांमधील बॅटरीची कार्यक्षमता कमी होते आणि त्यांना बदलण्याची आवश्यकता असते.
पारंपरिक बॅटरी रिसायकल केल्या जात होत्या
तज्ज्ञांच्या मते, पारंपरिक लीड-अॅसिड बॅटरीज रिसायकल करण्यात येत होत्या. मात्र, आतापर्यंत लिथियम-आयन बॅटरीचे पुनर्वापर करण्यासाठी पुरेसा योग्य मार्ग मिळालेला नाही. एवढेच नाही तर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीची विल्हेवाट लावणे हे खूपच किचकट काम आहे. ते खूप मोठ्या आणि जड असतात. या बॅटरी शेकडो लिथियम आयन सेल्सनी बनलेल्या असून त्यात अनेक घातक पदार्थ असतात. जर तुम्ही त्यांना काळजीपूर्वक तोडल्या नाही तर स्फोट होऊ शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की इलेक्ट्रिक वाहनांची बहुतेक उपकरणे पुन्हा वापरली जातात. मात्र, अद्याप बॅटरीचा पुनर्वापर करण्याचा कोणताही मार्ग नाही.
वाहनांमधून काढलेल्या बॅटरीची विल्हेवाट लावण्याचे सध्या तीन मार्ग आहेत. एकतर ते मोकळ्या जागेत फेकून द्या किंवा त्यातून उपयुक्त वस्तू काढण्यासाठी तोडून टाका किंवा पुन्हा वापरण्यायोग्य बनवा. मात्र, या बॅटऱ्या उघड्यावर फेकणे योग्य नाही. कारण, यामुळे माती प्रदूषित होऊ शकते. या बॅटऱ्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे वाहनांमधून काढलेल्या बॅटरी खूप शक्तिशाली असतात. त्या घरात ठेवलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरल्या जाऊ शकतात.
रिसायकल करणे हा सर्वोत्तम मार्ग
या बॅटरीज रिसायकल करणे हा चांगला मार्ग आहे. मात्र, सध्या देशात अशा सुविधांचा अभाव आहे. तज्ज्ञांच्या मते, देशातील लिथियम-आयन बॅटरीपैकी केवळ 5 टक्के बॅटरी रिसायकल केल्या जात आहेत. यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे रिसायकलिंग प्लांट उभारण्यासाठी होणारा प्रचंड खर्च.
भारतासाठी रिसायकलिंग किती फायदेशीर आहे?
गेल्या वर्षी, भारत सरकारने देशात लिथियम आयन बॅटरीच्या उत्पादनासाठी 18 हजार कोटींचे परफॉर्मेंस लिंक प्रोत्साहन जाहीर केले होते. त्यावेळी तज्ज्ञांनी सांगितले होते की, भारत सरकार या बॅटऱ्यांची संपूर्ण मागणी आयातीद्वारे पूर्ण करत आहे. या बॅटरीसाठीचा बहुतांश कच्चा माल चीनमधून आयात केला जातो. अशाप्रकारे, भविष्यात बॅटरी वाहनांची मागणी लक्षात घेता भारत पुनर्वापरात आघाडी मिळवू शकतो. चीन लिथियम-आयन बॅटरीच्या पुनर्वापरात आधीच खूप पुढे गेला आहे.