कराड वाहतूक शाखेच्या पोलिसांची कारवाई तीन लाख 59 हजार रुपयांचा गुटका जप्त
कुलदीप मोहिते-कराड
याबाबत पोलिसानी दिलेली माहीती अशी की, कराड शहरात रात्रीच्या सुमारास पोलिसांचे पेट्रोलिंग व वाहन तपासणी मोहीम सुरु होती. पोपटभाई पेट्रोल पंप येथे वाहतुक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू पाटील, महिला पोलिस कॉन्स्टेबल पुजा पाटील, बीट मार्शल संग्राम पाटील, दिपक पडळकर यांना नाकाबंदी दरम्यान एमएच 14 एएम 9092 हे वाहन दिसले. त्यांनी वाहन थांबवून चौकशी केली असता वाहनातील दोन युवकांच्या माहिती देण्यात विसंगती आढळल्याने वाहन तपासल्यानंतर त्यामध्ये गुटखा आढळला. यावेळी दोन्ही युवकांना सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांनी विश्वासात घेऊन गुटखा कोठून आणला याची माहिती विचारली असता युवकांनी कर्नाटकहून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी एकूण 3 लाख 59 हजारांचा माल तसेच चार चाकी वाहन जप्त केले असून पुसेसावळी येथील दोन संशयीतांना अटक केली. पुढील तपास सुरु आहे.