पॅरासेलिंग करताना दोरी तुटली आणि दोन महिला पर्यंटक 100 फूट उंचावरून थेट खोल समुद्रात
अमूलकुमार जैन-अलिबाग
अलिबागजवळ वर्सोली बीचवर पॅरासेलिंग करताना जीवघेणा अनुभव पर्यटकांना आला. पॅरासेलिंग करताना पॅराशूटची दोरी तुटली आणि दोन महिला पर्यंटक 100 फूट उंचावरून थेट खोल समुद्रात कोसळल्या.
मुंबईच्या सुजाता नारकर आणि सुरेखा पाणीकर या दोन महिला एकत्र पॅरासेलिंग करत असताना त्यांच्या पॅराशूटची दोरी तुटली. लाईफजॅकेटमुळे या दोन महिला समुद्रात पडल्यावर तरंगत राहिल्या. बोटचालकाने या महिलांना समुद्रातून पुन्हा बोटीत घेतलं. या महिलांचे काही नातेवाईक बोटीवर होते. त्यांच्या डोळ्या देखत हा भयानक प्रकार घडला.
या प्रकाराबद्दल आणि कमकुवत रोपवरून कुटुंबीयांनी बोटीच्या मालकाला धारेवर धरलं. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. असे प्रकार होतच असतात त्यात नवं काय असं बेजबाबदार उत्तर त्याने दिलं.
याआधी आता प्रकार मुरूड समुद्र किनारी दोन ते तीन वर्षांपूर्वी घडला होता यामध्ये एका बालकाचा मृत्यू देखील झाला होता. गुजरातमध्ये असा एक प्रकार घडला होता. आता महाराष्ट्रातील अलिबाग इथे ही घटना समोर आली आहे. तुम्ही जर पॅरासेलिंग करायला जात असाल तर काळजी घ्या. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे.