राज्यातील इंग्रजी शाळांचे १,७०० कोटी शासनाकडे थकीत !
उमेश पाटील-सांगली
राज्यातील इंग्रजी शाळांची आरटीईची १७०० कोटी रुपयांची प्रतिपूर्ती अद्यापही थकीत आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. महिनाभराच्या आत शाळांना आरटीईअंतर्गत प्रतिपूर्ती देण्यात यावी, अन्यथा विधिमंडळ अधिवेशनात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे (मेस्टा) संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी दिला आहे.
आरटीईमध्ये ६० टक्के केंद्र व राज्याच्या ४० टक्के वाटा आहे. केंद्राने वाटा दिल्यावरही राज्य सरकार शाळांना संपूर्ण रक्कम देत नाही. शिल्लक १८०० कोटी रुपयांपैकी केवळ काही महिन्यांपूर्वी १०० कोटींचे वाटप करण्यात आले. मात्र, करोनामुळे शाळांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे शिल्लक असलेली संपूर्ण प्रतिपूर्ती एका महिन्यात लवकर मिळावी. अन्यथा येणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही मेस्टाने दिला आहे. प्रदेश प्रवक्ता सोमनाथ वाघमारे यांनी राज्यस्तरीय त्रैमासिक सभेत झालेल्या सात ठरावांची माहिती यावेळी दिली. यापुढे राज्य भर या प्रश्नी जनजागृती करण्यात येणार असून मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत या प्रश्नी लवकरच मोबाईल बैठक व्हावी यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचे संजय तायडे पाटील यांनी सांगितले.