शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा
तहसिलदार विक्रम देशमुख यांचा हॉटेल रिसॉर्ट मालकांच्या बैठकीत इशारा
संजय गायकवाड-कर्जत
कोव्हीड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबाबत कर्जत तालुक्यातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल मालक व रिसॉर्ट मालक यांची बैठक कर्जत पोलीस ठाण्याच्या सभागृहात आयोजित केली होती, याप्रसंगी तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, कर्जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिता अथने उपस्थित होत्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी पोलिस तुमच्या कारवाई करण्यास इच्छुक नाहीत मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करा म्हणजे कारवाईचा प्रश्न येणार नाही असे सांगून प्रत्येक हॉटेल, रिसॉर्ट मालकांनी आपआपल्या आवारात सीसीटीव्ही बसवावेत असे सांगितले.
31 डिसेंबर व नववर्षाच्या अनुषंगाने कोरोना विषाणू व नविन विषाणू प्रजाती ओमीक्रॉंन च्या संक्रमणाचा प्रसार रोखण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती, राज्यातून,जिह्यातून येणारे प्रवाशी, पर्यटक यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे, तसेच सर्व नागरिकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे अश्या सूचना प्रामुख्याने देण्यात आल्या, तसेच कोव्हीड अनुरूप नियमांचे उल्लंघन करण्या-या हॉटेल मालक, रिसॉर्ट मालक व सामान्य नागरिक यांना दंड व शास्ती करण्यात येईल अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.यावेळी काहींनी प्रश्न उपस्थित केले त्यावर दोन्ही अधिकारी यांनी त्यांच्या प्रश्नाचे निरसन केले. रिसॉर्ट मालक उदय पाटील यांनी आम्ही आमच्या रिसॉर्ट वर आलेल्या ग्राहकांना 31 डिसेंबर साजरा न करता नविन वर्षाचे स्वागत करा असे सांगू असे सांगितले आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी केले.