शिर्की येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक
जेएसडब्ल्यू कंपनीने सीएसआर फंडातून मदत करण्याची ग्रामस्थांची मागणी
देवा पेरवी-पेण
पेण तालुक्यातील शिर्कि चाळ नंबर 2 येथील सागरवाडीत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. पहाटे एकविरा दर्शनासाठी निघालेले यशवंत पाटील, सुमन पाटील व भूषण पाटील यांचे सामूहिक मालकीचे संपूर्ण घर शॉर्ट सर्किटमुळे जळाले.
सदर कुटुंबातील सर्व व्यक्ती कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनाला घडलेल्या घटनेच्या दिवशी पहाटे 5.30 च्या दरम्यान निघाले होते. घरातून निघताना सर्व उपकरणे बंद केली होती. मात्र लाकडाचे जुने घर असल्याने व उंदीर त्रास देत असल्याने घरातील एकच बल्ब सुरू ठेवला होता. पण याच बल्बने घात करत शॉर्ट सर्किट मुळे सकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान घराला भीषण आग लागून काही क्षणातच संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. आणि यशवंत मारुती पाटील, सुमन मधुकर पाटील व भूषण मधुकर पाटील यांच्या सामूहिक मालकीचा शिर्कि चाळ नंबर 2 वरील सागरवाडी येथील घर जळून खाक झाला.
या आगीत घरातील सर्व फर्निचर, संपूर्ण विद्युत फिटिंग, टीव्ही, फ्रीज, फॅन आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू, शासकीय सर्व कागदपत्रे व भात, तांदूळ, सर्व कडधान्य आदी जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. सदर आगीची बातमी परिसरात वाऱ्या सारखी पसरताच सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, वडखळ पोलीस आदींनी तात्काळ भेट दिली. तर पोलीस व महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला. जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने सीएसआर फंडातून सदर कुटुंबाला मदत करावी अशी मागणी सागरवाडी ग्रामस्थांनी केली आहे.