पोलीस वसाहतीची मरणासन्न अवस्था सुंदर-स्वच्छ माणगांव या घोष वाक्याला छेदणारी
रविंद्र कुवेसकर-माणगांव
त्याकाळी इंग्रजांच्या काळात कायदा सुव्यवस्थेतील महत्वाची भुमिका बजावणारे पोलीस आणि त्यांना राहण्या साठी पक्की दगडी पोलिस लाईन आणि पोलिस निरिक्षकाचा बंगला तसेच कचेरी, कारागृह ही एकेकाळी तालुक्याची शान होती. आज त्यांची झालेली जिर्णावस्था याला नेमकं कोण जबाबदार, रायगडचे पोलीस अधिक्षक तसेच गृहमंत्री या गोष्टींकडे कधी पाहणार ? असा सवाल ऐरणीवर आला आहे. माणगांव मध्ये महसुल वसाहत, तहसिलदार, प्रांत यांची अद्ययावत निवासस्थाने झाली आहेत. परंतु दूर्दैवाने पोलीस अधिकारी, पोलीस भाड्याच्या खोल्यांतून राहत आहेत, हे विदारक सत्य आहे.
चोविस तास ऑन ड्युटी, कर्तव्य जोपासणाऱ्या पोलीसांना मात्र साध्या निवासस्थानां पासून वंचित राहावे लागत आहे. इमानईतबारे कर्तव्य जबाबदारी पार पाडणारे पोलीस, जरी त्यांची ही व्यथा बोलुन दाखवत नसले, तरी याचे निट अवलोकन केल्यास त्यांची नाराजी लपून राहत नाही. पोलीस मैदान आणि लाईनी परिसरात अक्षम्य दूर्लक्षाने आज जी स्थिती झाली आहे. ही एकाही लोकप्रतिनीधीला तसेच तालुक्यातील कारभार पाहणारे सक्षम अधिकाऱ्यांचे लक्षात का येत नाही ? सूंदर माणगांव स्वच्छ माणगांव या घोष वाक्याला छेदणारे हे हृदयद्रावक नग्नसत्य पाहून कोणालाही काहीच कसे वाटत नाही? विकासाच्या गप्पा मारणारे या आपल्या पारंपारिक ठेवा असलेल्या वास्तुंचे साधे जतन करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत सोयीनुसार विसरतात.
याबाबत माहिती घेतली असता आजवर आलेले अनेक पोलीस अधिकारी यांनी या वसाहतींच्या जिर्णोध्दार व नवनिर्माणा साठी खुप पाठपूरावा केला परंतु कोणीही लक्ष देत नाही, अस नैराश्येच्या भावनेतून बोलतात. पण या विषयाला कोणी हात घालायला धजावत नाही. हेच सत्य समोर येत आहे. याबाबत अनेकदा वर्तमान पत्रात बातम्या देऊनही अक्षम्य दुर्लक्षाने माणगांवचा पोलीस बंगला आता भुत बंगल्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे कि काय ? असे खेदजनक वास्तव आमच्या जवळ जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजयअण्णा साबळे यांनी याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता बोलुन दाखविले आहे. माणगांवकर उपहासाने आता बोलतात शहराचे सौंदर्याला पडलेला हा काळा डाग वेळीच साफ केला पाहिजे.
या वसाहतींवर रान माजले आहे. छप्पर सडले, छताला भोक पडली, पार मोडकळीस आली, माणसांचा वावर संपला आहे. साप, किड, मुंगी, विंचू या ठिकाणी वावरतात, हेही कमी म्हणुन कि काय, येथे अपघाती मोडलेल्या, पडलेल्या गंजलेल्या गाड्यांचे भंगार पाहावयास मिळते. २६ जानेवारी रोजी सक्षम अधिकारी, माणगांवकर नागरिकांनी आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचे शपथपूर्ण वाचन करताना, ज्या परिसरात आपण उभे आहोत, त्याचे विदारक वास्तव आजुबाजुला नजर टाकल्यास सहजी पाहिले आहे. त्यावेळी आपण नेमके आपले कर्तव्य जबाबदारी फक्त बोलण्या पूर्तीच उरली आहे का ? असा गंभीर सवाल ऐरणीवर आला आहे.