तीन हजार शाळा आजपासून पुन्हा गजबजणार
शाळा व्यवस्थापन समितीने नियंत्रण ठेवावे - जितेंद्र डुडी
उमेश पाटील-सांगली
जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या 2 हजार 977 शाळा पुन्हा आजपासून गजबजणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक समितीने नियंत्रण ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना कमी होताच शाळा सुरु करण्यासाठी शाळांना पालकांकडून सहमती दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील 2 हजार 977 शाळा जुलै महिन्यांपासून जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. शाळा सुरु करण्यात सांगली जिल्हा आघाडीवर होता. मात्र कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेवून अवघ्या चार महिन्यात पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय 7 जानेवारीला घेण्यात आला होता. शाळांमध्ये कोरोनाचा प्रसार होणार नाही, याबाबतची गंभीर दखल घेत जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा दि. 10 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. गत आठवड्यापासून कोविड-19 च्या तपासणीचा पॉझिटीव्हीटी दर स्थिर आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चेनंतर जिल्हाधिकार्यांनी 1 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील शाळा
- जिल्हा परिषदेच्या शाळा 1,774,
- खासगी प्राथमिक 460,
- खासगी माध्यमिक 712
शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही प्राथमिकता लक्षात घेऊन कोविडसंदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. शाळा सुरु करत असताना सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसीकरण (दोन्ही मात्रा) बंधनकारक आहे. याबरोबरच 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाबरोबरच शाळा व्यवस्थापनाने प्रयत्न करावेत. सर्व शिक्षणाधिकार्यांनी स्थानिक प्राधिकार्यांशी संपर्क साधून नियोजन करावे. दि 1 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकार्यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.