पाली नगरपंचायत चार जागांसाठी रस्सीखेच;इच्छुक उमेदवारांची मांदियाळी,
घोडेबाजार आणि पक्षांतर्गत बंडाळीची शक्यता?
विनोद भोईर-पाली-सुधागड
पालीसह जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या निवडणुका मंगळवारी (ता.21) संपन्न झाल्या. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पाली नगरपंचायतच्या 4 प्रभागांसाठी 18 जानेवारीला निवडणूक होत आहे. मात्र येथील 4 जागांसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. एकाच पक्षात अनेक उमेदवार बाशिंग बांधून आहेत. आपल्याला उमेदवारी न मिळाल्यास पक्षांतर्गत बंडाळी करण्याच्या मार्गावर ते आहेत. तर यावेळी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार देखील होण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक 2 व 14 साठी सर्वसाधारण महिला आणि प्रभाग क्रमांक 5 आणि 8 साठी सर्वसाधारण खुला असे आरक्षण पडले आहे. यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत बुधवारी (ता.29) ते सोमवार (ता.3) आहे. ओबीसी आरक्षण रद्द होण्याआधी या 4 जागांसाठी 19 नामनिर्देशन पत्र आली होती. इच्छुक उमेदवारांची संख्या पाहता नवीन नामनिर्देशन पत्र वाढण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही कोणत्याच पक्षांचे उमेदवार नक्की झालेले नाहीत. केवळ चर्चा आणि बैठका सुरू आहेत. एकाच पक्षात अनेक उमेदवार इच्छुक असल्याने नक्की कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत पक्षश्रेष्ठी देखील संभ्रवास्थेत व द्विधामनःस्थितीत आहेत. उमेदवार निवडीसाठी मग मतदार संघात बैठका व आढावा घेतला जात आहे. उमेदवारी न मिळाल्यास अनेकांनी अपक्ष उभे राहण्याची तयारी देखील दर्शविली आहे.
मंगळवारी (ता.21) 13 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना व भाजप वेगवेगळे लढले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेकाप यांनी आघाडी करून निवडणूक लढविली. त्यातही कोणी स्व पक्षाचा व आघाडीचा धर्म पाळला यात शंका आहे. मात्र आता हे चार उमेदवार नगराध्यक्ष ठरविण्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेली ही नगरपंचायत सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे.
मागील वर्षानुवर्षे येथील असंख्य प्रश्न व समस्या जैसे थे आहेत. आम्हाला सत्ता दिल्यास हे सर्व प्रश्न आम्हीच मार्गी लावू अशी आश्वासने सर्वच पक्षांचे नेते, मंत्री, आमदार व खासदारांनी प्रचारादरम्यान दिली आहेत.
जो तो म्हणतो विकासाची गंगा आम्हीच आणणार;वर्षानुवर्षे प्रश्न व समस्या जैसे थे !
शुद्धपाणी योजना प्रलंबित
पाली शहराला अंबा नदिचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पुरविले जाते. तब्बल 15 हजाराहून अधिक लोक व भाविक या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र अंबा नदीचे पाणी सांडपाणी, शेवाळ व केमिकलमुळे प्रदूषित झाले आहे. शोकांतिका म्हणजे पाली शुद्ध नळपाणी पुरवठा योजना मागील 15 ते 20 वर्षांपासून प्रलंबित आहे. सद्यस्थितीत जवळपास 12 कोटींची शुद्ध नळपाणी योजना अजूनही कार्यान्वित झालेली नाही. इतक्या वर्षांत कोणालाच ही योजना अंमलात आणता आली नाही. त्यासाठी नगरपंचायतीची वाट पहावी लागली का असा सवाल जनता विचारत आहे.
बाह्यवळण मार्ग अडचणीत
राज्यशासनाने सन २०१० ला वाकण पाली खोपोली राज्यमार्गावर बलाप येथून बाह्यवळण मार्गाला मान्यता दिली आहे. तसेच रस्त्यास १८ कोटी तर भूसंपादनासाठी १० कोटींची मंजुरी मिळाली होती. सदरचा मार्ग हा पाली पाटनुस राज्यमार्ग ९४ ला झाप गावाजवळ जोडला आहे. या मार्गालगत येणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी नष्ट होणार असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे मार्ग याबात तोडगा निघालेला नाही. हा मार्ग अडचणीत अडकला आहे. त्यामुळे पालीत सतत वाहतूक कोंडी होते.
तीर्थक्षेत्र विकास नाही
अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या संदर्भात पुढे वेग येत नाही. परिणामी येथे उत्तम सोयी सुविधा देऊन त्याचा विकास म्हणावा तसा होत नाही आहे.
अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असूनही पालीतील रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. मागील 5 वर्षांत येथे दर्जेदार रस्ते झालेले नाहीत.
कचरा व सांडपाण्याचे नियोजन नाही
पालीतील बहुसंख्य नाले व गटारे मोडकळीस आलेली आहेत. त्यामुळे ते वारंवार तुंबलेली असतात. कचरा कुंड्यांची देखील तीच अवस्था आहे. घंटागाड्यांची संख्या कमी आहे. घनकचरा व्यवस्थापनाची कोणतीच व्यवस्था नाही.
नवीन बस स्थानकाला मुहूर्त नाही