हुतात्म्यांच्या हौतात्म्याला फंदफितुरीची काळी किनार- आमदार महेंद्र थोरवे
हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
रायगड जिल्ह्याचे थोर सूपुत्र भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या हौतात्म्याला फंदफितुरीची काळी किनार लागली आहे,त्या दोन्ही हुतात्म्यांच्या हौतात्म्य यामुळे देशाचे आणि आपल्या जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे असे प्रतिपादन कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.नेरळ येथे आयोजित हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण सोहळ्यात बोलत होते,त्यावेळी रायगड जिल्ह्यातील पहिले थेट आयएसएस अधिकारी बनलेले प्रतीक जुईकर आणि माथेरानच्या डोंगरात कड्यावरचा गणपती साकारणारे निवृत्त रेल्वे मोटरमन राजाराम खडे यांना हुतात्मा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नेरळ येथील हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारक समितीच्या माध्यमातून सिद्धगड बलिदान दिन आणि हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते.यावेळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे,जेष्ठ कवी आणि संगीतकार अरुण म्हात्रे,रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे,तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख,नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच उषा पारधी,कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती जयवंती हिंदोळा,माजी सभापती सुजाता मनवे,कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी,कृषी रत्न शेतकरी शेखर भडसावळे आणि इतिहास संशोधक वसंत कोळंबे,नेरळ ग्रामपंचायतचे उपसरपंच मंगेश म्हसकर,नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर,तालुक्याचे नायब तहसीलदार एस आर बाचकर,आदी मान्यवर होते. यावेळी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्याला आमदार महेंद्र थोरवे आणि तर नेरळच्या सरपंच उषा पारधी यांनी हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला तर हुतात्मा स्मारक पाटी ला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पुष्पहार अर्पण केला.यावेळी नेरळ मधील नेरळ विद्या मंदिर शाळेच्या आणि हाजी लियाकत हायस्कुल च्या विद्यार्थ्यांनी समूह गीते सादर केली.
हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी रायगड जिल्ह्यातून भारतीय प्रशासकीय सेवेत थेट अधिकारी बनलेले प्रतीक जुईकर यांचा सन्मान करण्यात आला,त्यावेळी प्रतीक जुईकर हे आयएसएस ट्रेनींग साठी मसुरी येथे असल्याने त्यांचे पालक चंद्रशेखर जुईकर दाम्पत्य यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर माथेरानच्या डोंगरात एका दगडामध्ये गणपती साकारणारे रेल्वेचे निवृत्त मोटरमन राजाराम खडे यांना दुसरा हुतात्मा गौरव पुरस्कार देण्यात आला. मात्र प्रकृती अस्वस्थामुळे त्यांचा सन्मान त्यांची मुलगी नमिता हिने स्वीकारला.मानपत्र,शाळा,स्मृतिचिन्ह आणि झाडाचे रोपटे देऊन असे त्या पुरस्काराचे स्वरूप होते.त्यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रतीक जुईकर यांचे वडील चंद्रशेखर जुईकर यांनी त्याची जिद्द शाळेपासून दिसून आल्याने टाटा मोटर्स मध्ये सहायक व्यवस्थापक पदाची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला ,त्यावेळी देखील आम्ही पालकांनी देखील सहमती दर्शविली आणि आता आपल्या जिल्ह्याला आयएसएस अधिकारी मिळाला आहे. मात्र आपल्या जिल्ह्यात अनेक आयएसएस अधिकारी बनावेत यासाठी प्रतीक जुईकर मार्गदर्शन करीत असून त्यातच त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे अशी प्रतिक्रिया प्रतीक जुईकर यांच्या वतीने त्यांच्या पालकांनी दिली. तर हा संपूर्ण सोहळा प्रतीक जुईकर हे मसुरी येथील ट्रेनिंग कॅम्प मधून फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून पाहत होते.तर राजाराम खडे यांच्या वतीने हुतात्मा गौरव पुरस्कार स्वीकारणाऱ्या त्यांच्या कन्या नमिता यांनी माझ्या बाबांना त्या कड्यावरचा दगडात भास झाला आणि अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर निसर्गराजा गणपती साकारला. गेला त्या काळात ऊन पावसात काम करणारे माझे बाबा यांना एकदाही साधी लहानशी जखम झाली नाही.त्या ठिकाणी गुप्तधन आहे अशी कुजबुज सुरु असते,मात्र असे काही नव्हते आणि नाही देखील,त्यामुळे हा हुतात्मा गौरव पुरस्कार माझ्या बाबांचा एकट्याचा नसून गणपती बाप्पा साकारला जात असलेल्या सर्व हातांचा हा पुरस्कार आहे असे देखील नमिता खडे-पाटील यांनी जाहीर केले.
यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी या सोहळ्यात बोलताना मानवली येथील शासकीय कार्यक्रमाचे नियोजन आणखी चांगले आणि योग्य करायला हवे यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना त्यांनी केली.नेरळ येथील सोहळा दरवर्षी नियोजनबद्ध आणि कोणताही राजकीय भेदभाव न करता आयोजित होत असताना आगामी वर्षी कोणाला हुतात्मा गौरव पुरस्कार मिळणार आणि कोणते वक्ते पुढील वर्षी मार्गदर्शन करायला येणार याची उत्सुकता लागलेली असते हेच या कार्यक्रमाचे यश आहे अशी स्तुतीसुमने आमदार महेंद्र थोरवे यांनी स्मारक समितीच्या नेटक्या नियोजनाबद्दल उधळली.मात्र आपल्या जिल्ह्यातील या दोन्ही हुतात्म्यांच्या बलिदानाला फंदफितुरीची काळी किनार आहे.त्या फितुरीमुळे आपण दोन क्रांतिकारक यांना मुकलो असून त्यांची कसर कधीच भरून निघणार नाही.कारण शेतकऱ्यांवरील पिळवणूक भाई कोतवाल यांनी धान्य कोठ्या,शाळा उघडून आणि न्यायालयात शेतकर्यांसाठी मोफत वकिली करून सुरु केलेले समाजकार्य अर्धवट राहिले आहे. त्यात देशाचे नुकसानच झाले असून हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे आज सख्खे असे कोणीही वारस नाहीत हि देखील त्यांचा आदर्श घेणारी बाब आहे,पण आपण सर्व त्यांच्या वारसनाची उणीव त्यांच्या स्मृती जागृत ठेवून भरून काढत आहेत हे मोठे आदर्शवत काम आपण सर्व करत आहोत,यात कोणताही खंत पडणार नाही याची काळजी घेऊ सारे आश्वासन आमदार थोरवे यांनी दिले.
कवी अरुण म्हात्रे यांनी आपल्याला पुण्यात कार्यक्रम होता मात्र कर्जत तालुक्यातील हुतात्मे आणि कर्जत,नेरळ आणि माथेरान या भागाशी माझा ऋणानुबंध जोडला गेला आहे. त्यामुळे तेथील कार्यक्रम उरकून उशिरा हा ना होईलना मी पोहचलो असून येथे येऊन अभिवादन करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली आहे असे मत अरुण म्हात्रे यांनी मांडले. तर कर्जत तालुक्याला असलेलं इतिहास लक्षात गेहता माझी पावले या ठिकाणी वळतात आणि त्यातून संतोष पवार यांनी अनुपस्थिती कायम जाणवणार आहे पण पत्रकारांची हि पिढी त्यांची उणीव भरून काढेल असा विश्वास यावेळी म्हात्रे यांनी व्यक्त केला. तर कोणत्याही सामाजिक कार्याला मला बोलावले तर नक्की आवर्जून येणार असे आश्वासन म्हात्रे यांनी यावेळी दिले.
इतिहास संशोधक वसंतराव कोळंबे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात या दोन्ही हुतात्म्यांचा आणि त्यांच्या सर्व लढ्याचा इतिहास तारखा आणि इतिहासाचे दाखले देऊन सादर केला.त्यावेळी त्यांच्या ओघवत्या वाणीतील इतिहास समजून घेत असताना सुमारे अर्धा तास हुतात्मा चौकातील सर्वांचे कान ते ऐकण्यात एकवटले दिसून आले.या
स्मारक समिती कडून मागणी...
ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४८अ यास कर्जत तालुक्यातील हुतात्मे भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे नाव देण्याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन देण्यात आले. शहीद भाई कोतवाल,हिराजी पाटील राजमार्ग असे नाव राष्ट्रीय महामार्ग ५४८अ ला देण्यासाठी आपण राज्य सरकार आणि राज्याचे एमएसआरडीसीचे मंत्री एकनाथ शिंदे यांची स्मारक समितीच्या सदस्यांसह भेट घेऊ असे आश्वासन आमदार थोरवे यांनी यावेळी दिले.