अंबा नदी प्रदूषण व घाणीच्या विळख्यात; नागरिक व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात
विनोद भोईर-पाली-सुधागड
सुधागड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीला प्रदूषण आणि घाणीने वेढले आहे. नदीच्या पाण्यावर तवंग व शेवाळ आले आहे. सांडपाणी, प्रदूषित पाणी, घाण व कचरा, वाळू उपसा यामुळे नदीचे नागरिक व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याबरोबर नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पाली शहराला येथील अंबा नदीतून पाणी पुरवठा होतो. तसेच सुधागड तालुक्यातील अंबा नदी शेजारील गावांतील लोक व प्राणी देखील याच पाण्याचा पिण्यासाठी व वापरासाठी वापर करतात. पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी बंधारे कार्यान्वीत करुन अंबा नदिचे पाणी अडविले जाते. त्यामुळे या साठलेल्या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. तसेच नदितून वाहून अालेले प्रदुषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. रासायनिक कपंनीमधुन टाकऊ रसायन हे थेट आंबा नदीत सोडले जाते. तसेच रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाण देखिल साठते. नदिवर महिला कपडे व भांडी धुतात. तसेच नदित टाकलेले निर्माल्य कुजल्याने देखिल पाणी खराब होते. किनाऱ्यावर टाकलेली घाण व कचरा पाण्यात जातो. परिणामी ते अधिक दुषित झाले आहे. पाण्याला उग्र स्वरुपाची दुर्गंध येते, चवही खराब लागते. पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
अंबा नदीचा प्रवास
खालापूर तालुक्यातील चावणी आंबेनळी घाट व सुधागड तालुक्यातील मानखोरे या दोन ठिकाणांहून अंबा नदीचा उगम होतो आणि पुढे हे दोन्ही प्रवाह एकत्र येऊन मोठी नदी तयार होते. अनेक गावे समृद्ध करत ही नदी वडखळ जवळ धरमतरच्या खाडीला जाऊन मिळते. तब्बल 80 ते 90 किमीचा प्रवास करते. खालापूर, सुधागड, रोहा, अलिबाग आणि पेण अशा साधारण 4 तालुक्यातून अंबा नदी वाहते. यातील सर्वाधिक प्रवास सुधागड तालुक्यातून होतो. मात्र विविध कारणांनी अंबा नदीचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.
अंबा नदीचे पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. हे प्रदूषण थांबवून अंबा नदी संवर्धनाची व योग्य नियोजनाची गरज आहे. फिल्टरपणी योजना कार्यान्वित झाली पाहिजे
रवींद्रनाथ ओव्हाळ -सामाजिक कार्यकर्ते
शुद्ध पाण्याची प्रतिक्षा
अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या पालीला कोणतीही प्रक्रिया न करता अंबा नदिचे पाली पुरविले जाते. मात्र पाली शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना मागील 15 ते 20 वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनाने केलेल्या 2008 - 09 च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणार्या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण 7 कोटी 79 लाखाचा निधी व 10 टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतू राजकीय श्रेयवादामध्ये हि योजना रखडली गेली. त्याबरोबर 10 टक्के लोकवर्गणीचा प्रश्न देखिल होता. मात्र पालीला ‘’ब’’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी 11 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. आता ही रक्कम आणखी वाढली आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे. पण अजुनही हि योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही. सर्वच राजकिय पक्ष व त्यांचे पुढारी या योजनेचे निवडणूकी पुरते भांडवल करतात. नगरपंचायत प्रस्थापित झाल्यावर तरी ही समस्या मार्गी लागेल अशी अपेक्षा पालीकर करत आहेत.
प्राण्यांचे हाल
असंख्य पाळीव व वन्यप्राणी यांचे जीवन अंबा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. दुषित पाण्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी इतर पाण्याच्या स्त्रोताचा शोधा घ्यावा लागतो. त्यांचेही हाल दुषित पाण्यामुळे होत आहेत.
अंबा नदीचे पाणी दूषित झाले आहे. नदी किनारी असलेल्या सर्व कंपन्यांना नोटीस पाठवलेली आहे. तसेच गटविकास अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक आयोजित केली आहे. नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे.
दिलीप रायण्णावार, तहसिलदार
र