लाखाचे सव्वा लाख देतो असे सांगून फसवणूक
अट्टल गुन्हेगार मेहबूब उल्डे पोलिसांच्या ताब्यात
दिघी सागरी पोलिसांची कारवाई
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
तुम्ही मला एक लाख रुपये द्या मी तुम्हाला सव्वा लाख रुपये देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या बोर्ली पंचतन येथील अट्टल गुन्हेगार मेहबूब उल्डे यास दिघी सागरी पोलीस ठाणे पोलिसांनी अटक केली आहे तर याच आरोपीच्या विरोधात याआधी देखील फसवणुकीच्या तक्रारी असल्याचेही समजते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी मंगेश मधुकर कीर्तने राहणार गीरणे, तालुका तळा, जि. रायगड यांची एका मित्राच्या मध्यस्थीने आरोपी मेहबूब अहमद उल्डे वय 46 वर्षे राहणार बोर्ली पंचतन, ता. श्रीवर्धन, जि रायगड याच्या सोबत ओळख झाली होती. यावर आरोपी मेहबूब याने मंगेश कीर्तने यांच्याशी संपर्क करून तुम्ही मला 500 रुपये च्या नोटाच्या स्वरूपात रोख रक्कम 1 लाख रुपये द्या मी तुम्हाला 100 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात 1 लाख 25 हजार रुपये देतो असे सांगितले यावर मंगेश किर्तने यांनी विश्वास ठेवीत 80 हजार रुपये आरोपीस 14 जानेवारी 2022 रोजी आरोपीच्या घरी दिले परंतु ठरल्या प्रमाणे पैसे देताना आरोपीने शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली यावर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर मंगेश कीर्तने यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली, यावर गुन्हा रजिस्टर नंबर 3/2022 भा द वि कलम 420, 406, 506, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मेहबूब उल्डे यास अटक करण्यात आली आहे तर याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे हे करीत आहेत.
"सध्या झटपट पैसे कमविण्याच्या नादामध्ये काही लोक कोणत्याही आमिषाला बळी पडून आपली स्वतःची फसवणूक करून घेत आहेत. ऑनलाइन फसवणूक झाल्याचे प्रकार देखील घडले आहेत, आपली कोणतीही माहिती इतरांना शेअर करू नका, व पैसे डबल करून देतो असे भूलथापा मारणाऱ्यांवर देखील विश्वास ठेवू नका, कोणाची फसवणूक होत असेल किंवा झाली असेल तर पोलिसांना कळवा."
संदिप पोमाण,
सहाय्यक पोलीस निरीक्षक