आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते दादर गावात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन
यापुढील जिल्हा परिषद सदस्य दादर गावातीलच - रविशेठ पाटील
देवा पेरवी-पेण
पेण तालुक्यातील दादर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पेण विधानसभा मतदार संघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी स्थानिक विकास कार्यक्रम निधी योजने अंतर्गत विविध विकास कामांसाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आज त्यांच्या शुभहस्ते कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यापुढील जिल्हा परिषद सदस्य दादर गावातीलच होणार असून गावात लवकरच अस्थिविसर्जन घाटासाठी निधी उपलब्ध केला जाईल असेही आमदार रविशेठ पाटील यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, दादर गावचे युवा सरपंच विजय पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती नाशिकेत पाटील, माजी सरपंच मोहन नाईक, माजी सरपंच गोरखनाथ पाटील, गजानन पाटील, प्रल्हाद पाटील, मोहन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भरत पाटील आदी मान्यवरांसह आणि मोठ्या संख्येने दादर ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार रविशेठ पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून रस्त्यांचे डांबरीकरण, जुना तलाव सुशोभीकरण, पूरनियंत्रण संरक्षण बंधारा, अंगणवाडी इमारत, अंतर्गत रस्ते, निवारा शेड, परिसर सुशोभिकरण, रस्ते काँक्रीटीकरण, प्राथमिक शाळा इमारत दुरुस्ती, चेकर लादी बसविणे आदी 16 विकास कामांसाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी बोलताना सांगितले की, दादर गाव माझा माहेरघर असून मी या गावचा हक्काचा माणूस असल्याने हा निधीच नाही तर यापेक्षाही जास्त निधी देऊन या गावाला झुकते माप द्यायचे आहे. सध्या दादर गाव भांडण विरहित गाव झाला आहे. यापुढे गावाला सुजलाम सुफलाम करायचे आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी दादर गाव भाताचा कोठार असल्याने व संपूर्ण भाग खाडी किनाऱ्यालगतचा असल्याने या ठिकाणी संबंधित मंत्र्यांशी बोलून संरक्षक बंधारा बांधून घेण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. सेझ मध्ये गेलेल्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना मिळवून देऊ. मागील दोन वर्षाच्या कोरोना काळात विकास निधी देता आला नाही याची खंत व्यक्त करून आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या भागातील चित्र बदललेले दिसेल. तर यापुढील पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा सदस्य हे दादर गावातीलच असेल असे आमदार रविशेठ पाटील यांनी जाहीर केले.