तळा बसस्थानक परिसर बनले खाजगी वाहनतळ.
स्थानकात सर्वत्र खाजगी वाहनांची वर्दळ.
किशोर पितळे-तळा
तळा बसस्थानक परिसर सध्या खाजगी वाहनतळ बनले असून बसस्थानकात सर्वत्र खाजगी वाहनांची वर्दळ असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.एसटीचे विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.हा संप अद्यापही मागे घेण्यात आला नसल्याने तळा बसस्थानक परिसरात एकही एसटी फिरकत नाही.याचाच फायदा घेऊन खाजगी वाहन चालक बिनधास्तपणे बसस्थानकात आपली वाहने उभी करीत आहेत.इको,मॅक्सिमो, पिकअप,रिक्षा,यांसारख्या गाड्या बसस्थानकात ठाण मांडून असल्यामुळे बसस्थानकाला सध्या खाजगी वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.मध्यंतरी माणगाव डेपोच्या दोन एसटी बस तळा बसस्थानकात दाखल झाल्या होत्या.त्यावेळी बसस्थानक खाजगी वाहनांनी फुल्ल भरलेले असल्यामुळे बस चालकांना एसटी बाहेरच उभ्या कराव्या लागल्या होत्या.वाहतूक कंट्रोलरने सूचना दिल्यानंतर बसस्थानकात खाजगी वाहने लावणे बंद झाले होते परंतु काही दिवस प्रवासी वाहतूक केल्यानंतर प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने या बस देखील बंद करण्यात आल्या आहेत.त्यामुळे रिकाम्या झालेल्या बसस्थानकात पुन्हा खाजगी वाहनांनी शिरकाव केला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.