देगावफाटा ते वर्णे आबापुरी रस्त्याचे काम सुरु करा अन्यथा आंदोलन छेडू
उमेश चव्हाण यांचा इशारा : बांधकाम विभागाला निवेदन
मिलिंद लोहार -सातारा
सातारा एमआयडीसीतील देगाव फाटा ते वर्णे आबापुरी या रस्त्याची अत्यंत दूरावस्था झाली आहे. याबाबत वारंवार निवेदने, तक्रारी दिल्यानंतर शासनाने या रस्त्यासाठी निधी मंजूर केला, दोन लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करुन नारळ देखील फोडले आहेत. मात्र, अद्याप रस्त्याच्या कामास सुरुवात झालेली नाही. येत्या आठ दिवसात या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्या रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा लोकसाहित्यिक आण्णाभाऊ साठे कृती समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात चव्हाण यांनी म्हटले आहे की, देगाव फाटा ते वर्णे आबापुरी रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. रस्त्याच्या कामाचा एकदा आमदार शशिकांत शिंदे तर एकदा आमदार महेश शिंदे यांनी नारळ फोडून शुभारंभ केला आहे. मात्र, चार ते पाच महिने होवून देखील या रस्त्याच्या कामास आरंभ झालेला नाही.
सध्या रस्त्याच्या गटर बांधण्याचे काम सुरु असून ते देखील अत्यंत धिम्यागतीने सुरु असून हे कामही निकृष्ट दर्जाचे होत आहे. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याची बिकट अवस्था झाली असून फोर व्हिलर, टु व्हिलर गाड्यानां व येण्याजाणाऱ्या कामगारांना व शाळेतील विद्यार्थ्यांना वयोवृध्द लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या कामाची पाहणीही बांधकाम विभागाने करण्याची गरज आहे. रस्त्याची अवस्था बिकट असून शासनाने निधी मंजूर करुन वर्क ऑर्डर काढून ठेकेदाराला काम दिलेले असताना ते गतीने होणे अपेक्षित असताना वर्षभर या रस्त्याचे काम गटराच्या कामात गाळत ठेवले असून नागरिकांना या रस्त्याने प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
देगावफाटा ते वर्णे आबापुरी रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे तसेच गटर बांधकाम व रस्त्याचे काम दर्जेदार करावे अशी नागरिकांची मागणी असून बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला सूचना करुन या कामला गती दिली नाही तर दलित महासंघ आण्णाभाऊ साठे कृती समितीच्यावतीने रस्ता रोको आंदोलन छेडू, असा इशारा उमेश चव्हाण व ओंकार निकम यांनी दिला आहे. यावेळी उमेश चव्हाण, ओंकार निकम, मनिषा पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते.