पेण पोलिसांच्या हातावर तुरी
कस्टडी मधील आरोपी पळाला
देवा पेरवी-पेण
पेण येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मशीन वर दरोडा टाकून 56 लाख 34 हजार 800 रुपये रोकड घेऊन पळून गेलेल्या दरोडेखोरांनी पेण पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगलेली असतानाच आज रविवारी सकाळी पुन्हा पेण पोलिसांच्या जेल मधील आरोपीने पलायन केल्याने पेण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, वडखळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाबळ जवळील कार्ली गावात झारखंड येथील पोकलन ऑपरेटर राजेंद्र यादव ( वय 42, रा.झारखंड) याच्यावर त्याचा सहाय्यक असलेला बिरु गणेश महातो ( वय 19, रा.झारखंड ) याने किरकोळ कारणावरून धारदार कोयत्याने वार करुन त्यास गंभीर जखमी करण्याची घटना 28 जानेवारीला घडली होती. या प्रकरणी वडखळ पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्र.16 / 2022 भा द वि कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी बिरु महातो याला अटक केली होती. या आरोपीला पेण पोलीस ठाण्याच्या पोलीस कस्टडी मध्ये ठेवण्यात आले होते. आज रविवारी या आरोपीला प्रातविधी साठी सकाळी बाहेर काढण्यात आले होते. मात्र आरोपी बिरु महातो याने शौचालया च्या बाजूस असलेल्या भिंतीवरून उडी मारुन मागील बाजूने प्रभू आळी बाजूला पळाला असल्याची माहिती मिळत आहे.
कास्टडीतील आरोपी पळाल्याची माहिती मिळताच पेण पोलिसांची एकच धावपळ उडाली.या आरोपीच्या शोधात जवळपास अख्खे पोलीस स्टेशन पेण शहर, मुंबई - गोवा महामार्ग, पेण खोपोली रोड, रेल्वे स्टेशन, बस स्टँड परिसरात शोध घेत होते. या आरोपीच्या तपासा साठी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस देखील पेण चा परिसर पिंजून काढत होते. मात्र सायंकाळ उशिरा पर्यंत हा आरोपी पोलिसांना सापडून आला नव्हता.