Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

काळनदीच्या पात्रात रात्रीची मासेमारी करणाऱ्यावर मगरीचा हल्ला.

काळनदीच्या पात्रात रात्रीची मासेमारी करणाऱ्यावर मगरीचा हल्ला.

जीवावर आलेले संकट पायावर निभावले

रविंद्र कुवेसकर-माणगांव


माणगांवच्या काळ नदी पात्रात रात्री ९.३० वा. च्या सुमारास येथिल ब्रिटीश-कालिन पुलाखालील पाण्यात मासेमारी करीता गेलेल्या नितीन पवार या तरुणावर मगरीने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना बुधवार दि.१६ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या हल्यात मगरीने तिच्या जबड्यात नितीनचा पाय पकडला पण नितीनने झटका मारुन पाय सोडवल्याने त्याच्या जीवावरचे संकट पायावर निभावले, पायाला किंचीत फ्रॅक्चर व जखम झाली आहे. सुदैवाने जवळच असलेला नितीनचा भाऊ सचिन पवार व संजय काळे तसेच येथील झोपडपट्टी वासियांनी घटनास्थळी धाव घेतल्याने नितीनच्या जीवावरचे संकट टळले. दरम्यान घटनेची चाहूल लागताच मदतनीस धावून आल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. 

सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की माणगांव काळनदी किनारी झोपडपट्टीत राहणारे सचिन बाबा पवार यांचे भाऊ नितीन बाबा पवार यांनी काळ नदीच्या पात्रात मासे पकडण्यास अगोदरच जाळे (कंडाळ) पसरले होते, ते जाळे बुधवार दि.१६ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३०  वाजता काढण्यासाठी नितीन नदीच्या पात्रात उतरला असता अचानक मगरीने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. दरम्यान स्वतःला वाचविण्यासाठी नितीनने आरडओरड केल्याने जवळच असलेला त्याचा भाऊ सचिन पवार व संजय काळे तसेच येथील झोपडपट्टीतील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन नितीन पवारचे प्राण वाचविले. या हल्ल्यामध्ये नितीन पवारच्या डाव्या पायाला मोठ्या प्रमाणात जखम झाली असून माणगांव उपजिल्हा रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत. 

याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील डाॅ. प्रदिप इंगोले यांचेशी प्रस्तुत पत्रकाराने संपर्क करुन माहीती घेतली असता, नितीनची प्रकृती स्थिर असुन पायाला किरकोळ फ्रॅक्चर व जखम झाली आहे. ज्या मगरीने हल्ला केला ती मगर सहा फूट लांबीची असावी असा तेथिल लोकांचा अंदाज आहे. काही वर्षापूर्वी या माणगांव काळ नदीच्या पात्रात मच्छिमारां च्या जाळ्यात अडकुन मृत अवस्थेतील मगर सापडल्याचे लोक बोलतात. या नदी पात्रात मगरींचे वास्तव्य अधुन मधुन आढळत असल्याने, आता मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शक्यतो माणसाची चाहुल लागताच मगर जवळ थांबत नाही. पाण्यात झेपावत गायब होते. 

संबंधित वनविभाग अधिकाऱ्यांनी, मगरी आढळुन येणारे संवेदनशिल भागात त्यांचा उपद्रव होऊ नये यासाठी उपाय योजना व जनजागृती करावी, अशी माणगावकरांनी मागणी केली आहे . सदर परिस्थिती पाहता वेळ आणि काळ सांगून येत नाही, म्हणून नदीकिनारी राहत असलेल्या झोपडपट्टी-वासियांनी व नदीत मासेमारी करणार तसेच माणगांवकरांनी या घटनेची दखल घेत, या ठिकाणी वावरताना सावधानता बाळगावी. असे आवाहन माणगांव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies