मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-शरद पवार एकत्र कार्यक्रमाला असूनही शिवसेनेचे तीन आमदार गैरहजर; जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार?
अमूलकुमार जैन-अलिबाग
रायगड जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना एकत्र आणले. शिवसेनेचे तीन आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांना या कार्यक्रमाचे रीतसर निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, सध्या या तीनही आमदारांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांना हटवण्याच्या मागणीवर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती असून तसेच खुद्द शरद पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती असून देखील शिवसेनेच्या तीनही आमदारांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता.
त्यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात सुनील तटकरे यांनी ठाकरे-पवार यांना एकत्र आणून दाखवल्याची जेवढी चर्चा रंगली त्यापेक्षा जास्त चर्चा शिवसेना आमदारांच्या बहिष्काराची रंगली. शिवसेना आमदारांनी एक प्रकारे खासदार सुनील तटकरे यांना आपली ताकद दाखवून दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जरी ऑनलाइन उपस्थित असले तरी व्यासपीठावर फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. शिवसैनिक या कार्यक्रमाकडे फिरकले देखील नाहीत. यातून मुख्यमंत्र्यांनी देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांना एक वेगळा “राजकीय संदेश” दिल्याचे मानण्यात येत आहे. आपण जरी कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून अधिकृतरीत्या उपस्थित असलो तरी संघटनात्मक पातळीवर पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेच्या आमदारांना अनुपस्थित राहण्याची मुभा उद्धव ठाकरे यांनी दिली होती का?, याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.