"पर्यटनोत्सव"
विकेंडला पर्यटकांनी बीच फुल्ल!, व्यावसायिक ही सुखावले
अमूलकुमार जैन-अलिबाग
२०२० मध्ये कोरोनाचे संकट जगावर घोंगाऊ लागले. त्यामुळे भारत व पर्यायाने महाराष्ट्र सर्वत्र लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी, जिल्हाबंदी असे निर्बंध घालत कोरोनाला अटकाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर त्यांनतर काहीसा कमी झालेला कोरोनाचा प्रभाव पुन्हा 2021 मधील मार्च महिण्यात दिसून आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्य व्यवस्था व प्रशासन , शासन सर्वांचा ताण वाढला. तर 2022 च्या सुरवातीला पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोके वर काढले त्यामुळे पुन्हा निर्बंधांचा ससेमिरा नागरिकांच्या मागे लागला. अशात रायगड जिल्हा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध अशी ख्याती असलेला जिल्हा. मुंबई आणि पुणे या दोन्ही महानगरांच्या मध्यावर असल्याने जिल्ह्याला अगणिक महत्व आहे. जिल्ह्याला लाभलेला 112 किमीचा प्रशस्त आणि मनाला भुरळ घालणारा समुद्र किनारा, पर्यटनासाठी प्रसिद्ध अशी ठिकाणे, ज्यामध्ये माथेरान, मुरुड, श्रीवर्धन, अलिबाग, कर्जत, अष्टविनायक क्षेत्रे, दिवेआगर, कळंब प्रति गाणगापूर, कनकेश्वर मंदिर, आक्षी, ऐतिहासिक स्थळे अशा ठिकाणी पर्यटक येत असतात. यासह विकेंडमध्ये येथील कृषी पर्यटन, फार्म हाऊस, याठिकाणी पर्यटकांची मांदियाळी असते. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय देखील वृद्धीगंत होत आहे. अनेक नवीन तरुण व्यावसायिक पर्यटन व्यवसायात आपली कारगिर्दीची सुरवात करू पाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात हजारो फार्महाऊस, कृषी पर्यटन केंद्र, हॉटेल, कॉटेज, रेस्टॉरंट, खानावळी उभ्या राहिल्या आहेत. मात्र 2020 नंतर कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी केलेले लॉकडाऊन या पर्यटन व्यवसायाच्या मुळावर उठले. निर्बंधांमुळे सर्व ठप्प झाल्याने पर्यटन व्यवसायाचे अर्थचक्र बिघडले. तर पहिली कोरोनाची लाट संपताना त्यातून सावरत असताना पुन्हा कोरोनची दुसरी लाट आली आणि विकेंड लॉकडाऊन करण्यात आले. या काळात बंद असलेले आपले व्यवसाय पुन्हा उभे करण्यासाठी उधाऱ्या, कर्ज करणाऱ्यांची पुरती वाट लागली. कर्ज फेडायची कशी असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला होता. मात्र जानेवारी महिन्यात आलेली तिसरी लाट ही सौम्य ठरल्याने कोरोना चा बीमोड झाला असल्याचे चित्र आहे. तर यानंतर लागू असलेले निर्बंध शिथिल झाल्याने जिल्ह्यात आता पर्यटकांची पावले मोठ्या प्रमाणात वळू लागली आहेत. विकेंडमध्ये ही संख्या मोठी आहे. तेव्हा लाखो पर्यटकांची उपस्थिती जिल्ह्यात लागली आहे.
शनिवारसह रविवारी अलिबागेत पर्यटकांची जत्रा भरल्याचे चित्र समुद्रावर दिसत होते. समुद्र स्नानाचा आनंद बच्चे कंपनीसह मोठेही घेत होते. उंट, घोडा, तसेच एटीव्ही बाईकचा आनंद लुटताना पर्यटकांची धूम मस्ती सुरू होती. पर्यटक पुन्हा अलिबागेत येऊ लागल्याने स्थानिक व्यवसायिकही आनंदित आहेत. पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने हॉटेल, लॉज, रिसॉर्ट व्यवसायिक याना आर्थिक फायदा होऊ लागला आहे. सलग आलेल्या सरकारी सुट्यांमुळे मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांतूनही जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. अलिबागसह, नागाव, आक्षी, वरसोली, किहिम, मांडवा, आवास, काशीद, मुरूड, श्रीवर्धन, दिघी अशा अनेक समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केली. घोडागाडी, एटीव्ही बाईकवर स्वार होऊन समुद्रकिनार्यांचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत. समुद्रकिनार्यावरील स्टॉलवर वडापाव, भजी, पॅटीस असे वेगवेगळे प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. कोरोनामुळे ठप्प झालेल्या लहान-मोठ्या व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आम्ही मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी सुट्यांमध्ये येतो. या वेळेला अलिबाग समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटला आहे. या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत हे पाहून चांगले वाटले. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे.
मंगेश कृष्णमूर्ती, पर्यटक
आम्ही मुंबईत राहत असल्याने मुंबईच्या जवळचे ठिकाण म्हणून रायगड जिल्ह्यात विकेंड साजरा करण्यासाठी येत असतो. अनेकदा आम्ही माथेरानला गेलो आहोत यंदा अलिबागला आलो. येथील समुद्रकिनारा, सीफूड यांचा वेगळा आनंद आम्हाला मिळाला. यासह मुले देखील खुश झाली.
प्रियांका कुरेशी, पर्यटक
चल डबल सीट ....
अलिबाग समुद्र किनाऱ्यावर सध्या डबल सीट सायकलचा ट्रेण्ड दिसून येतो, तर या ठिकाणी डबल सीट सायकल ही पर्यटकांना भुरळ पाडत असल्याने जास्त करून जोडपे या सायकलवर एक रपेट तरी मारतातच