रोहा तालुक्यात सर्व्हर डाऊन ए.टी.एम. मधून रक्कम बाहेर येत नसल्यामुळे ग्राहक संभ्रमात
श्याम लोखंडे-कोलाड
रोहा तालुक्यात गेल्या आठवड्यापासुन सर्व्हर डाऊन असल्यामुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याच प्रमाणे बँक मॅनेजर आणि कॉम्पुटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे ग्राहकांच्या समस्यांना वारंवार तोंड दयावे लागत आहे.
विशेष म्हणजे गेल्या पाच तारखेपासून ए.टी.एम. धारकांनी ए.टी.एम. मशीन मधून पैसे काढण्यासाठी योग्य त्या प्रक्रिया करून सुद्धा ए.टी.एम. मधुन ५ फेब्रुवारी पासून पैसेच बाहेर पडत नसल्यामुळे ग्राहकांच्या मनात कमालीची भिती निर्माण झाली असून कोलाड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक विश्वनाथ हे ग्राहकांना योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. तसेच पैसे कोठेही जाणार नाहीत सर्व्हर व्यवस्थित कार्यान्वित झाल्यानंतर तुमचे पैसे तुम्हाला मिळतील कोणीही घाबरू नका असे अनेक ग्राहकांना कोलाड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोलाड शाखा प्रमुख विश्वनाथ यांनी सांगितले.
दिवस भरात दररोज दहा ते पंधरा ए.टी.एम. धारकांच्या ह्या समस्येला शाखा व्यवस्थापकांना तोंड दयावे लागत आहे. 5 फेब्रुवारी 2022 पासून ही समस्या प्रकर्षाने भेडसावत असल्याने अनेक ए.टी.एम. धारक तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे.
कोलाड नाक्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, आर. डी. सी. सी तसेच बँक ऑफ इंडिया तसेच पतपेढ्या आहेत. या सर्वांचे काम मोठ्या प्रमाणावर ठप्प झाले आहे. ए.टी. एम. मधुन रक्कम निघत नसल्यामुळे स्लीप भरून रक्कम काढण्यासाठी अनेक जण रांगेत उभे राहुन रक्कम काढत आहेत.