पुरस्कार भेटलेल्यांची जबाबदारी आणखी वाढली असल्याने त्यांनी यापुढे आणखी जोमाने काम करावे : पालकमंत्री आदिती तटकरे
अमूलकुमार जैन-अलिबाग
आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून, समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या व्यक्तींचा रायगड जिल्हा परिषदेतर्फे रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे. रायगड भूषण पुरस्कार अत्यंत मानाचा पुरस्कार असून, ह पुरस्कार भेटलेल्यांची जबाबदारी आणखी वाढली असल्याने त्यांनी यापुढे आणखी जोमाने काम करावे, अशी अपेक्षा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी (ता.६) अलिबागमध्ये रायगड भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात व्यक्त केली.
रायगड जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या रायगड भूषण पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रविवारी अलिबाग येथील पी.एन.पी. नाट्यगृहात शानदार कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आमदार बालाराम पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, पनवेल नगरपालिका माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व पक्षांचे पक्षप्रतोद, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
सर्वप्रथम परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी यांना रायगड भूषण पुरस्कार देऊन रायगड जिल्हा परिषदेने काही वर्षांपूर्वी या पुरस्कारांची सुरुवात केली. त्यानंतर नियमितपणे रायगड भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. मात्र २०१९ नंतर कोविड निर्बंधांमुळे आज दोन वर्षांनंतर रायगड भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे पुरस्कारर्थींची संख्या जास्त असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना रायगड भूषण पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार प्राप्त व्यक्तींची संख्या जास्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या व्यक्ती जिल्ह्यात आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आणखी जोमाने काम करावे.
योगिता पारधी अध्यक्षा, जिल्हा परिषद रायगड.
..............
समाजात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याच्या भावनेतून रायगड जिल्हा परिषदेतर्फे रायगड भूषण पुरस्कार देण्यात येत आहे. यापुढेही पुरस्कार देण्याची परंपरा अशीच सुरू राहील. दोन वर्षानंतर पुरस्कार सोहळा होत असल्याने पुरस्कार प्राप्त व्यक्तींची संख्या जास्त आहे.
सुधाकर घारे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद रायगड