Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आनंदवनात कर्णबधिरांसाठी मार्गदर्शन सत्र संपन्न

आनंदवनात कर्णबधिरांसाठी मार्गदर्शन सत्र संपन्न

राजेंद्र मर्दाने- चंद्रपूर

 
महारोगी सेवा समिती निजबल अंतर्गत संधिनिकेतन अपंगाची कर्मशाळा व आनंद मूकबधिर विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कर्णबधिर मुला - मुलींकरीता " शिक्षणाचे महत्त्व व महिला हक्क " या विषयावर आनंदवनातील निजबल येथील प्रांगणात मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

    व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी मंडलिक, जयश्री सोमण ( मुंबई ),  संधिनिकेतन अपंगांच्या कार्यशाळेचे अधीक्षक रवींद्र नलगिंटवार, आनंद मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भसारकर प्रामुख्याने उपस्थित होते.

     मार्गदर्शन सत्रात मुंबईहून आलेल्या व स्वतः कर्णबधिर असलेल्या नंदिनी मंडलिक आणि जयश्री सोमण यांनी  खाणाखुणांची सांकेतिक भाषा, कृती अभिनय, विद्यार्थी सहभाग या माध्यमातून प्रभावी संवाद साधला.  ' शिक्षणाचे महत्त्व व महिला हक्क ' यावर आपले विचार मांडताना त्या म्हणाल्या की, शिक्षणामुळे व्यवहारज्ञान वाढते. समाजात, प्रवासात सामान्य व्यक्तींशी व्यवहार करण्यासाठी तसेच उच्च शिक्षणासाठी सामान्यांप्रमाणेच कर्णबधिरांनाही भाषेचा वापर करता आला पाहिजे. यासाठी सतत प्रश्न विचारत, माहिती घेत शब्दसंग्रह करावा, असा सल्ला त्यांनी दिला. समाजातील काही वाईट प्रवृत्तीकडून कर्णबधिर मुलींची फसवणूक होऊ शकते, या करिता आई - वडिलांचा सल्लामसलत करून निर्णय घ्या, असे ही त्यांनी मुलींना सुचविले. कुटुंबातील व्यक्तींना समजून घ्या, सहकार्य करा ,चांगली संगत ठेवा याबाबी त्यांनी नाट्यमय पद्धतीने व विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन समजावून सांगितले.

स्वत:च मूकबधिर असलेल्या मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शब्दाच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या भावना समजून घेत या उपक्रमाचा भरपूर आनंद लुटला. सुरूवातीला रवींद्र नलगिंटवार यांनी आनंदवन निर्मित भेटवस्तू देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद मूकबधिर विद्यालयातील सेवानिवृत्त विशेष शिक्षक दीपक शिव यांनी केले. आभार मुख्याध्यापक विजय भसारकर यांनी मानले. 

      संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे व कार्यकारी विश्वस्त कौस्तुभ आमटे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित मार्गदर्शन सत्रात दोन्ही शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

     कर्णबधिर व्यक्ती कर्णबधिर मुलांना किती तन्मयतेने व आपुलकीने समजावून सांगतात व मुलेही त्यांना कसा उत्तम प्रतिसाद देतात याचा प्रत्यय या कार्यशाळेतून आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies