महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजला आ. शिवेंद्रराजेंकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर
मिलिंद लोहार- सातारा
महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेल्या 19 वर्षीय पृथ्वीराज पाटीलला स्पर्धा आयोजित केलेल्या संयोजकांकडून 1 रुपयांचीही मदत न मिळाल्याची खंत असलेला पृथ्वीराजचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सातारा- जावलीचे आमदार व अजिंक्य उद्योगसमुहाचे प्रमुख शिवेंद्रराजे भोसले यांनी तातडीने पृथ्वीराजला सातारा- जावलीकरांच्यावतीने 5 लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर केली आहे.
या संदर्भात बोलताना आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, महाराष्ट्र केसरी ही कुस्तीची अजिंक्यपद स्पर्धा सातार्यात आयोजित करण्यात आली होती. खरंतर राजधानी सातार्यात ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेत सर्वांना सामावून घ्यायला हव होतं. मात्र, तसे घडले नाही याउलट ज्याने अत्यंत कष्टाने महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला त्याचाच व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये आपल्याला संयोजकांनी फक्त महाराष्ट्र केसरीची गदा दिली. याव्यतिरिक्त कोणतेही बक्षीस दिले नाही, अशी खंत पृथ्वीराज पाटील व्यक्त करताना दिसत आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेल्या मल्लाकडून अशा पद्धतीने नाराजी व्यक्त होणे सातार्याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. मला स्वतःला सातारकर म्हणून या विषयाची खंत वाटली. संयोजकांनी प्रायोजकांच्या माध्यमातून घेतलेले पैसे मग गेले कुठे? असा सवाल अनेक मल्ल आता विचारू लागले आहेत. जिल्हयातून व राज्यातून या महाराष्ट्र केसरीसाठी अनेकांनी मदत दिली आहे. जर महाराष्ट्र केसरीलाच ही मदत मिळालेली नसेल तर या मदतीचे पुढे काय झाले? असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला आहे. त्यामुळेच पृथ्वीराजच्या नाराजीची दखल घेऊन सातारा- जावलीकर म्हणून मी तातडीने माझ्यावतीने महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील यांना 5 लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर करीत आहे. ही रक्कम आम्ही तातडीने पृथ्वीराजला देत आहोत, असेही आमदार शिवेंद्रराजे यांनी जाहीर केले.