महाराष्ट्र जगाला विश्वशांती संदेश देईल
प्रियांका ढम- पुणे
स्वार्थापोटी मानव अशांतता पसरविण्याचे षडयंत्र करत असून यातूनच जगात दहशतवाद रक्तपात पसरतोय अशावेळी संतांची भूमी महाराष्ट्र जगाला विश्वशांती, बंधुत्व आणि मानवी कल्याणाचा संदेश देण्याचे कार्य करेल. तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा विचार या भूमीतून जगापर्यंत पोहचेल. महाराष्ट्राने देशाला वैचारिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विचार दिला. आता विश्वाला शांतीचा मार्ग दाखविण्याचे कार्य महाराष्ट्र करेल अशी भावना भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांनी व्यक्त केली. माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी राजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठा विश्वशांतीचा घुमटात श्रीमद् भगवद्गीता ज्ञानभवनाचा लोकार्पण सोहळा आणि तीन दिवसीय विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित आठव्या वर्ल्ड पार्लमेंटच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते