सांगलीच्या मुख्य वन अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा: कार्यालयातच घडला प्रकार: महिला वन अधिकाऱ्याची तक्रार: जिल्ह्यात खळबळ
उमेश पाटील - सांगली
सांगली वन विभागाच्या कुपवाडमधील मुख्य कार्यालयात मुख्य वन अधिकाऱ्याकडून त्याच कार्यालयातील महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित पिडीत महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार संशयित उप वनसंरक्षक विजय माने यांच्यावर कुपवाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वन विभागाच्या कार्यालयातच हा प्रकार घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. दरम्यान, उपवनसंरक्षक विजय माने सध्या प्रशिक्षणासाठी अमरावती येथे गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली वन विभागाचे मुख्य कार्यालय कुपवाड हद्दीत आहे. या कार्यालयात संशयित विजय माने व पिडीत वनपरिक्षेत्र महिला अधिकारी एकत्र सेवा बजावतात.संबंधित महिला अधिकारी २८ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी सरकारी कामाची माहिती देण्यासाठी उपवनसंरक्षक विजय माने यांच्या केबिनमध्ये गेली. यावेळी संशयित माने यांनी त्यांच्या वैयक्तिक डायरीतील नोंदी बघण्याचा बहाणा करून तिला जवळ बोलावून घेतले. त्यानंतर लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन केले. याबाबत संबंधित महिलेने शुक्रवारी सायंकाळी कुपवाड पोलिसात धाव घेऊन माने यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पिडीत महिला अधिकाऱ्याची चौकशी केली.पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपवनसंरक्षक माने याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील करीत आहेत.