पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना पाच लाखांच्या विम्याचे संरक्षण देण्याकरिता केंद्राची मदत घेऊ - आमदार संजय केळकर आमदार
- पेण अर्बन बँकेच्या शेवटच्या ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
- बँकेचा लुटारूंना शासन करायला लावून त्यांचा हिशोब चुकता करू
देवा पेरवी- पेण
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना पाच लाखांच्या विम्याचे संरक्षण देण्याकरिता केंद्र शासनाची मदत घेऊ व शेवटच्या ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवु अशी घोषणा आमदार संजय केळकर यांनी पेण येथे पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या प्रसंगी केली. केंद्र सरकारच्या मदतीने परिवर्तन निदेशालय (ईडी) कोर्टाकडे पेण अर्बन बँकेच्या असलेल्या मालमत्ता लवकरात लवकर त्यांच्याकडून घेऊन त्याचा विनियोग ठेवीदारांचे पैसे देण्याकरिता करण्यात यावा याकरिता विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या आंदोलनात पेण अर्बन बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, आमदार संजय केळकर, पेणचे आमदार रवीशेठ पाटील, उरणचे आमदार महेश बालदी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, संघर्ष समिती कार्याध्यक्ष नरेन जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, डी.बी.पाटील, पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वैकुंठ पाटील, ललित पाटील, नगरसेवक प्रकाश पाटील, शोमेर पेणकर, अजय क्षीरसागर, संघर्ष समितीचे नामदेव कासार, ज्ञानदेव बांधल, मधुकर कुलकर्णी, दिलीप निंबाळकर, गजानन गायकर, दिलीप दुधे, मंगला खरे, विभावरी भावे, संदीप मोने, साकिब मुजावर, वासुदेव पाटील यांच्यासह असंख्य संख्येने ठेवीदार उपस्थित होते.
10 हजार ठेवीदारांसह धारकरच्या बंगल्याला घेराव घालणार-आ.रवी पाटील
पेण अर्बन बँकेच्या संचालकांनी 2 टक्के जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून गोरगरीब सामान्य नागरिकांच्या कष्टाचे पैसे गोळा करून 758 कोटी रुपयांचा घोटाळा केला. आणि ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले. ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याकरिता पेण अर्बन बँकेचा मुख्य आरोपी शिशिर धारकर याच्या बंगल्याला 10 हजार ठेवीदारांना घेऊन आपण घेराव घालणार असल्याची घोषणा आमदार रवीशेठ पाटील यांनी यावेळी केली. ठेवीदारांसाठी आमची जेलमध्ये जाण्याचीही तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. धारकर व त्याच्या बगलबच्चांनी पेण नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकार्यांना दमदाटी करून नगरपालिकेचा पाच कोटी रुपयांचा निधी बेकायदेशीररित्या पेण अर्बन मध्ये ठेवला होता. त्यामुळेच पेण शहराचा विकास रोखला गेला होता असा आरोपही यावेळी भाजप आमदार रवीशेठ पाटील यांनी केला.
राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन ठेवीदारांना न्याय देऊ- धैर्यशील पाटील
ठेवीदारांचे कष्टाचे पैसे मिळवून देण्याकरिता लॉंग मार्च व रस्त्यासह न्यायालयीन लढाई संघर्ष समितीच्या माध्यमातून मागील बारा वर्ष सुरू ठेवल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिली. बँकेच्या ठेवीदारांना काही प्रमाणात पैसे मिळाले खरे परंतु सर्वसामान्य ठेवीदारांना आजही पूर्णतः न्याय मिळाला नाही. कोणतेही राजकारण न करता ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा अधिक तीव्र करू या असे आवाहन संघर्ष समितीचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच अनेक ठेवीदारांनीही यावेळी आपल्या व्यथा मांडल्या.