राज्यात बेताल वक्तव्ये करणाऱ्यांची दादागिरी चालणार नाही- खा. बाळूभाऊ धानोरकर
राजेंद्र मर्दाने- चंद्रपूर
परस्पर बंधूभाव हे महाराष्ट्र धर्माचे वैशिष्ट्य आहे. राज्यातील नागरिक समजूतदारपणा, सामंजस्य व मैत्रीच्या तालावर वाटचाल करीत आहे. त्यात ' थाली बजाओ, भोंगा निकालो ' अशी फालतुगिरी, नेतागिरी चालू आहे. मूठभराचे गैरवर्तन, उथळ वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात तोकडी विचारधारा, बेताल वक्तव्ये करणाऱ्यांची दादागिरी चालणार नाही, असे रोखठोक प्रतिपादन, खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले. रमजान ईदचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकी तसेच राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने मुस्लिम समाज संघर्ष समिती, वरोरा तर्फे येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात ' ईद मिलन समारोह ' आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर सत्कारमूर्ती म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी ( आयपीएस ) आयुष नोपाणी, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, माजी न.प. सभापती छोटूभाई शेख, विशेष आमंत्रित उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, अतिथी म्हणून एमआयएमचे राज्य प्रवक्ते प्रा. जावेद पाशा, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, भाजपा नेता बाबा भागडे, राष्ट्रवादीचे विलास नेरकर, शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
खा. धानोरकर पुढे म्हणाले की, एक जागरूक नागरिक या नात्याने शहरात धार्मिक सदभाव कायम रहावा यासाठी मी चुकीच्या कामाचा नेहमीच विरोध केला. ते म्हणाले की, शहरात विविध जाती व समुदायाचे लोक एकत्र येऊन सर्वधर्म समभाव या वृत्तीने मोठ्या उत्साहात एकमेकांचे सण साजरे करतात. सध्या राज्यात राजकीय व सामाजिक वातावरण गढूळ झाले असताना सुद्धा शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित होती. राष्टीय एकात्मता जपणे ही शहराची संस्कृती आहे. त्यामुळे वरोरा शहर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, शहरात सर्व एकत्र येऊन धार्मिक सण साजरे करतात. या माध्यमातून एकात्मतेचा संदेश मागील अनेक वर्षांपासून दिला जात आहे. अजमेर शरीफ ( ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती ) वर आमची गाढ श्रद्धा असल्याने मागील काही वर्षांपासून आम्ही न चुकता दरवर्षी अजमेरला जातो. येथील अनेक मुस्लिम बांधवही शेगांव, शिर्डीला दर्शनासाठी जातात. कोणी कोणत्या देवा - धर्मावर श्रद्धा ठेवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सामाजिक सदभाव वृद्धिंगत होत असतात अनेकांची पोटदुखी सुरू होते. परस्पर सौहार्दाचे वातावरण कायम ठेवून, जातीवादी राजकारण न करता सर्वांसाठी समानतेच्या दृष्टीने न्याय देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे, असे त्यांनी नमूद केले.
प्रा. पाशा आपल्या भाषणात म्हणाले की, काही नतद्रष्ट मंडळी आपल्या निहीत स्वार्थासाठी, सर्वसामान्य जनतेवर प्रभाव पाडण्यासाठी व महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्यासाठी हिंदू - मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बेताल वक्तव्ये करणाऱ्यांच्या मागे जाऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला एकतेचा व मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या धर्मनिरपेक्ष वृत्तीचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, रायगडावरील बांधकाम पाहण्यासाठी शिवाजी महाराज गेले होते. तिथे हिंदू धर्मियांसाठी व्यवस्था करण्यात आल्याचे दिसले. यावेळी त्यांनी सुक्ष्म निरिक्षण करुन मुस्लिम रयतेसाठीही व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यांच्यासाठी मानवता धर्म श्रेष्ठ होता. असाच सामाजिक सलोखा वरोऱ्यात कायम राहील. शहरात हिंदू मुस्लिम एकात्मता पक्की असल्याचेही ते म्हणाले.
नोपाणी म्हणाले की, बाहेर राज्यात ट्रेनिंगवर असताना धार्मिक उत्सवानिमित्त शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मला वरिष्ठांच्या आदेशानुसार परत वरोऱ्याला यावे लागते. परंतु या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विविध धार्मिक सणात येथील शांतताप्रिय व परोपकारी नागरिकांचा प्रत्यय आला. सामाजिक बांधीलकीच्या स्तुत्य उपक्रमास व ईद मिलन समारोहाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, रमेश राजूरकर, बाबा भागडे, मुकेश जीवतोडे, छोटू शेख, अहेतेशाम अली यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, वरोरा तालुक्यात कधींही जातीय तेढ निर्माण झाले नाही व यापुढेही होणार नाही. सामाजिक सदभाव वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने घेतलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी मुस्लिम समाज संघर्ष समिती तर्फे व्यासपीठावरील मान्यवरांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. तदनंतर मुस्लिम समाज भवनासाठी जागा, निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार प्रतिभा धानोरकर, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, माजी न.प. सभापती छोटू शेख तथा उल्लेखनीय योगदानाबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांचा शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. आमदार खासदार निधीतून मुस्लिम कब्रस्थानसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजरी, नागरी,चंदनखेडा, शेगांव (बु) येथील मज्जीद कमेटीच्या वतीने खासदार/आमदार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी शाबान शेख, मुश्ताक अली, सादीक अली, डॉ.शेख, डॉ.टेकाम, फिरोज सिद्दीकोट, मोहसीन अख्तर, आनंदवन मित्र मंडळाचे डॉ. वाय. एस. जाधव, प्रा. बळवंत शेलवटकर, राजेंद्र मर्दाने, दीपक शिव, राहुल देवडे, रवी चौहान, गोल्हर, डॉ. प्रशांत खुळे, बाळू जीवणे, सुनिल सिरसाट, राजू मिश्रा, राजू कश्यप, वैभव डहाणे, एड. रोशन नकबे, हितेश राजनहिरे, प्रमोद काळे, सलीम पटेल, नबी कुरेशी, जुबेर भाई, अजय रेड्डी, नुतेश कुंभारे व तालुक्यातील नागरिक ईद मिलन समारोहासाठी उपस्थित होते.
प्रास्ताविकात अशफाक शेख यांनी समितीची भूमिका विषद केली. सूत्रसंचालन राहील पटेल यांनी तर आभारप्रदर्शन मोहसीन हाशमी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाहीद अख्तर, अयुब खान, मोहम्मद शेख, पाशा काजी, बशीर कुरेशी, बशीर अन्ना, मोहसिन पठाण, शब्बीर शेख, कादर शेख, शकील खान, अफसर शेख, अबरार शेख, अरशद मलिक, अकिल खान, आशिक अजानी, इक्बाल शेख, जमील शेख, नदीम शेख, जाकीर शेख, इरफान रंगरेज, मिन्हाज अली, अनीस शेख आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रमानंतर उपस्थितांनी शीरखुर्मा व भोजनाचा आस्वाद घेतला.