कर्जतला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न
ज्ञानेश्वर बागडे - कर्जत
तहसिलदार कर्जत कार्यालय व कर्जत तालुका आणि परिसरात शोध आणि विमोचन कार्यामध्ये आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यात सदैव अग्रेसर असलेली रक्षा सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने वादळ, पूरपरिस्थिती उपाययोजना व प्राथमिक प्रथमोपचार अशा आपत्ती व्यवस्थापन विषयांवर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख या वेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गेल्या वर्षी पावसाळ्यात रायगड जिल्हा व परिसरात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती येऊन खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी व वित्तहानी झाली. कर्जत तालुक्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विषयावर सजग करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणात राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस), कर्जत मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक बळवंत घुमरे , कर्जत पोलिस स्टेशन येथील कर्मचारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी अभिनव ज्ञान मंदिर येथील शिक्षक व राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी, अभिनव ज्ञान मंदिर कॉलेज, मिडलाईन अकॅडमी याचबरोबर नागरी संरक्षण दलातील काही स्वयंसेवक सहभागी झाले होते. तसेच खालापूर तालुक्यातील खोपोली येथील अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था, पनवेल येथील निसर्ग मित्र संस्था यांचे आपत्ती व्यवस्थापनात व शोध व विमोचन कार्यात सहभागी होणारे सदस्य सहभागी झाले होते. रक्षा सामाजिक विकास मंडळाने आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात , कर्जत तालुक्यातील नागरिक वगळता शहापूर, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, बदलापूर, मुरबाड, पडघा, मोहपाडा येथून नागरिक सहभागी झाले होते. कर्जत येथील रॉयल गार्डन गार्डन येथील सीबीसी रेसिडेन्सी येथील सभागृहात हे प्रशिक्षण घेण्यात आले.
हे प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत (NDRF) देण्यात आले. सदर प्रशिक्षणात वादळ पूरपरिस्थिती याची पूर्वतयारी वादळात कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी पूर परिस्थितीत आल्यावर कोणत्या प्रकारे स्वतःचे व दुसऱ्याचे संरक्षण कोणत्या प्रकारे करावे एखादी दुर्घटना घडल्यास प्रथमउपचार कशा पद्धतीने द्यावे? व्यक्तीचे हृदय बंद पडल्यास त्याच्यावर कोणत्या प्रकारे प्रथमउपचार (CPR) करावे याबद्दलचे प्रशिक्षण देण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत SI धर्मेंद्र सेवडा व यांची टीम उपस्थित होती
ही माहिती रक्षा सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष अमित गुरव यांनी दिली.