पेण तालुक्यात ग्रामीण रस्ते महाराष्ट्रात नंबर वन
ग्रामीण भागातील रस्त्यांना मिळालाय नवीन साज
देवा पेरवी- पेण
महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेण तालुक्याने आता विकास कामांत गती घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नंबर वन असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांना देखील एक नवीन साज चढू लागला आहे. ग्रामीण रस्ते चकाचक झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. हे रस्ते करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे व रामेश्वर कन्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका यांच्यावर पेण मधील सरपंच व प्रवाशांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रस्ते विकासाचे ध्येय असणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून देशभरात विविध रस्ते विकासाची कामे होत असताना आता पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते सुद्धा चकाचक होऊ लागलेत. अनेक वर्षे खड्डेमय असलेले पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते मागील काही वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होते. रस्त्यांवरील खड्डे आणि खचलेल्या रस्त्यांनी ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली होती. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था बघून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रा.मो.गोसावी, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदवे, पेण उपविभागीय अभियंता डी.एम.पाटील यांनी पेण तालुक्यातील रस्त्यांची फक्त दुरुस्तीच नाही तर निधी उपलब्ध करून थेट नवे रस्ते तयार करण्याचा चंग बांधला. यावेळी त्यांना साथ मिळाली ती रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांची.
पेण तालुक्यातील वाशी, वढाव, काळेश्री, हमरापूर, दादर, वशेणी, निगडे, पाबळ, वाकरूळ, वरवणे आदी रस्ते उत्कृष्ठ पद्धतीने तयार केले असून पूर्णतः चकाचक केले आहेत. मुसळधार पावसासाठी ओळख असलेल्या कोकणातील ह्याच रस्त्यांवर येणाऱ्या पावसाळ्यात प्रवाशांना चिखलमुक्त प्रवास करायला मिळणार आहे. तसेच जेष्ठ नागरिक, गरोदर महिला, आजारी व्यक्ती, लहान मुले यांचा प्रवास यारस्त्यावरून सुखकर होणार आहे. रामेश्वर कन्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका यांच्या या कामाबद्दल या भागातील सरपंच, उपसरपंच तसेच नागरिक समाधान व्यक्त करून त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचा दाखला देत आहेत.