‘स्वर मैफीलीने’ जिंकली पुणेकरांची मने
'लॉकडाऊन'नंतरच्या पहिल्याच कार्यक्रमाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने महेश काळे भारावले
प्रियांका ढम- पुणे
‘मन मंदीरा तेजाने’, ‘शब्दांवाचुन कळले सारे’, ‘घेई छंद मकरंद’, ‘कानडा राजा पंढरीचा' अशा सदाबहार गीतांनी सजलेल्या 'स्वर मैफीली'मधून गायक महेश काळे यांनी श्रोत्यांची मने जिंकली. 'लॉकडाऊन'नंतर झालेल्या या पहिल्याच कार्यक्रमात आयएलएस विधी महाविद्यालयाचे मैदान 'हाऊसफुल' झाल्याचे पाहून खुद्द महेश काळे ही भारावले आणि त्यांनी रसिकांना टाळ्या वाजवून अभिवादन केले. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने महेश काळे यांच्या सुरेल मैफीलीचे आयोजन अंजनेय साठे यांनी केले होते.
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘मना मंदिरा तेजाने’ या गाण्याच्या सादरीकरणावेळी रसिकांनी गायकाच्या आग्रहावरून हजारोंच्या संख्येने मोबाईलमधील लाईट लावून वातावरण अक्षरशः भारावून टाकले.
यावेळी उद्योजक, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात सामाजिक कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले.
अंजनेय साठे यावेळी म्हणाले की, “कोरोना सारखे भयानक मळभ दुर सरल्या नंतर साधारण अडीच वर्षानंतर ऐवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येत प्रचंड प्रतिसाद देत तुम्ही कार्यक्रमाचा आनंद घेत आहात याचा माझ्या मनाला नक्कीच आनंद होत आहे. खऱ्या अर्थाने ही तुमची मला मिळालेली कौतुकाची थाप आहे. माझ्या पंजोबांनी स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात देशाच्या स्वातंत्र्यासाठी कारावास भोगला आहे. हा समाजहिताचा वारसा पुर्वीपासुनच घरात आहे तो अधिक जोमाने पुढे नेहण्याची जबाबदारी माझी आहे. समाजासाठी दातृत्वाचे संस्कार मनात खोलवर रुजलेले आहेत. यापुढे ही ते कायमच असतील.