Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

जगातील सर्वश्रेष्ठ लोककल्याणकारी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज - प्रा. मिथुन माने

 जगातील सर्वश्रेष्ठ लोककल्याणकारी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज - प्रा. मिथुन माने 

कुलदीप मोहिते- कराड

"छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे एखाद्या जाती धर्मासाठी नव्हते तर ते राष्ट्रनिर्मितीसाठी होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनीच पुरोगामित्वाची परंपरा चालू करून या मातीत लोककल्याणकारी विचार पेरण्याचे काम केले. म्हणून ते जगातील सर्वश्रेष्ठ लोककल्याणकारी राजे आहेत." असे प्रतिपादन महाराष्ट्राचे युवा वक्ते . प्रा.  मिथुन माने यांनी केले. 

        वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड आणि यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'शिवस्वराज्य दिन' समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून 'लोककल्याणकारी राजा : छत्रपती शिवाजी महाराज' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराडचे जनरल सेक्रेटरी मा.प्रकाश पांडुरंग पाटील (बापू) हे होते. 

     

प्रमुख पाहुणे प्रा.मिथुन माने पुढे म्हणाले की, "अंधश्रद्धेवर प्रहार करून  अठरा पगड जातीतील लोकांच्या कल्याणासाठी राज्य निर्माण करणारा राजा, महिलांना शंभर टक्के संरक्षण देणारा राजा, शेतकरी सुखी व्हावा म्हणून सर्व मदत करणारा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होत. जिजाऊंच्या संस्कार व संस्कृतीमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले आज त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे."

   अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. प्रकाश पांडुरंग पाटील (बापू) म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज शिवस्वराज्य दिन साजरा करत असताना त्यांच्या विचारांचा वारसा जोपासणे महत्वाचे आहे. राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातून आपणाला जोवनोपयोगी नीतीबोध मिळत असतो.  आज विविध दृष्टिकोणातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा अभ्यास व्हावा.  शिवविचार रुजविण्यासाठी आज शिवस्वराज्य दिन साजरा होत असताना मला मनस्वी आनंद होत आहे." 

    वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये 'शिवस्वराज्य दिना'निमित्त सकाळी 7:30 वाजता शिवज्योत रॅलीस कराड शहरातील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून सुरवात झाली.  महाविद्यालयाच्या प्रवेशदारावर शिवज्योत रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास प्रकाश पाटील (बापू) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याच ठिकाणी राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत, पोवाडा व देशभक्तीपर गीतांचे विद्यार्थ्यानी गायन व सादरीकरण केले.  त्यानंतर प्रमुख पाहुणे . मिथुन माने व . प्रकाश पाटील (बापू ) यांच्या हस्ते भित्तीपत्रक, गडकिल्ल्यांचे संवर्धन या विषयावरील पोस्टर प्रदर्शन व छत्रपती शिवाजी महाराजांवरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.  तसेच प्रमुख कार्यक्रमामध्ये शिवस्वराज्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व पोस्टर स्पर्धामध्ये सहभागी विद्यार्थांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. 

    यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सभोवती नानाविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. 

    या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक   प्राचार्य डॉ. एल. जी.  जाधव यांनी केले. तर अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय  अमेय पाटील यांनी करून दिला.  कु. सानिया दीक्षित व कु. समृद्धी चावरे यांनी सूत्रसंचालन केले. तर  यश डवरी याने सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केले.    

     या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराडचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार, जिमखाना उपाध्यक्ष प्रा. डॉ. आर. ए. केंगार, दोन्ही महाविद्यालयातील उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies