आमदार महेंद्र थोरवे यांची तिकिटासाठी चोहोबाजूंनी कोंडी!!
शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला?
(निवडणूक विधानसभेची - संतोष दळवी)
राष्ट्रवादीला उठसूठ अंगावर घेणे पडू शकत महागात
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत उभा वाद आहे.तो सर्वश्रुत आहे मात्र सरकार मध्ये है दोन्ही पक्ष बसल्याने जनतेला वाटल की हा वाद शमेल मात्र तो अधिकाधिक उफाळून येऊ लागला.आमदार महेंद्र थोरवे यांनी ज्या ज्या वेळी संधी मिळेल त्या त्या वेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.मंत्री आदिती तटकरे यांच्यावर त्यांनी टीका केली.याच गोष्टींचा विचार करता सुनील तटकरे हे कर्जत खालापूर विधानसभा जागेवर हक्क सांगत आहेत.तशात भाजपचा एक गट कर्जत खालापूर या जागेवर आग्रही आहे.कोकणात मंत्री रविंद्र चव्हाण म्हणतील तो उमदेवार दिला जाऊ शकतो .किरण ठाकरे यांना चव्हाण यांनी अनेक विकासकामे दिल्याने व विधानसभेची तयारी करण्याच्या दृष्टीने जोरदार पाठबळ दिल्याने कर्जतच्या जागेवर रायगडातील इतर सहा जागेपेक्षा सर्वच पक्षाने लक्ष केंद्रीत केल्याने आमदार थोरवे यांना तिकीट मिळवणं अवघड असल्याचे बोलल जातंय.ज्या मित्र पक्षांची मदत घेऊन निवडणूक लढवायची आहे त्यांनाच अंगावर घेत आहेत.मित्र पक्षातील हनुमान पिंगळे यांना राष्ट्रवादीतून शिंदे गटात घेतल्याने तटकरे यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी कर्जत विधानसभेवर हक्क सांगायला सुरुवात केली आहे.कर्जत तालुक्यात सुधाकर घारे यांच्या रूपाने त्यांना मजबूत नेतृत्व मिळाले असल्याने घारे यांना नाराज करून राष्ट्रवादीची हानी करून घ्यायची नसल्याने व जुन्या नव्या राजकीय वादाची मोट बांधून तटकरे यांनी थोरवे यांच्या तिकिटाला अपशकून केला आहे.
शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला
आमदार महेंद्र थोरवे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. मातोश्री बरोबर घरोब्याचे संबंध गुंडाळून त्यांनी शिंदे यांना साथ दिली. त्या बदल्यात थोरवे यांना अनेक विकास कामे करण्याची संधी दिली.आमदार थोरवे यांची जाहीररीत्या कोणी वरिष्ठ नेता बाजू घेताना दिसत नाही किंवा मीडियात कोणी बाजू घेताना दिसत नाही त्यामुळे कोण कोणाला तिकीट मिळवून देत यावर साऱ्या कर्जत खालापूरकरांचे लक्ष लागून राहिलं आहे. कर्जतच्या या जागेसाठी मुख्यमंत्री शिंदे भारी भरतात की प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे भारी भरतात हे पाहणे येत्या काळात औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान तिकीट मिळवण्यासाठी नमनालाच इतकं घडाभर तेल गेल्याने भले महायुतीतील कोणालाही तिकीट मिळाल्यास कोण कुणाचं काम करणार हा प्रश्नही अनुत्तरीत राहतो.समेट घडवून आणण्यासाठी महायुतीतील वरिष्ठ किती यशस्वी होतात हे येत्या काळात दिसेल.