नको नको म्हणताना,अखेर लाल डब्ब्यात बसले गोगावले!!
दुधाची तहान ताकावर!
महाराष्ट्र मिरर टीम
सरकारने देऊ केलेलं एस टी महामंडळाचे अध्यक्षपद नाकारत असताना द्यायचं असेल तर आपल्याला आगामी मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद द्या असे सांगणारे शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी अखेर लाल डब्ब्यात बसण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची नियुक्तीही करण्यात आली.
एस टी महामंडळाचे अध्यक्षपद म्हणजे लाल डब्ब्यावर झालेली गोगावले यांची बोळवण असून त्यांच्या दुधाच्या तहानेवर शिंदे सरकारने ताक पाजल्याची चर्चा रायगडात चर्चेली जात आहे.
अनेकदा मंत्रीपदाने हुलकावणी दिल्याने कॅबिनेट मंत्रीपदासाठी आग्रही होते. त्यांना कॅबिनेट मंत्री होऊन रायगड जिल्ह्याच पालकमंत्री व्हायचं होत. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागल्याने त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल अशी अपेक्षा होती दरम्यान रायगडात राष्ट्रवादीशी चार हात करत आपण रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ अशा आशा त्यांच्या पल्लवीत झाल्या होत्या त्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा कोटही शिवलेला होता मात्र त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी कुठलं मांजर आडव गेलं हे त्यांचं त्यांनाच माहिती,अशी चर्चा रायगडात ऐकिवात येत आहे.
नव्याने झालेले महामंडळाचे अध्यक्ष गोगावले यांच्यासमोर एस टी महामंडळाची अनेक आव्हाने आहेत. त्यांच्याच मतदार संघात येणाऱ्या महाड आणि पोलादपूर एस टी डेपो यांचे काम शिवाय राज्यात एकूण ११० महामंडळे आहेत त्यातील अनेक महामंडळाना सरकारकडून निधीच मिळत नसल्याने कमी कालावधीत कशी सुधारणा करणार हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर असल्याने त्यांनी महामंडळ नाकारलं असावं असा सूरही ऐकिवात येत आहे.