आमदार थोरवेंचे तिकीट कन्फर्म!
सुधाकर घारेंना तिसऱ्या आघाडीचा पर्याय !
(निवडणूक विधानसभेची -संतोष दळवी)
रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या तीनही आमदारांचे तिकीट कन्फर्म असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी महाराष्ट्र मिररला दिली असल्याने तिकिटासाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेल्या उमेदवारांची मात्र यानिमित्ताने घोर निराशाच पदरी पडण्याची शक्यता दाट आहे.
रायगड जिल्ह्यात शिंदे गटाचे विद्यमान आमदार तीन आहेत.विद्यमान आमदार या निकषावर या तीनही आमदारांना तिकीट दिले जाणार असल्याचं खात्रीशीर वृत्त सुत्रांनी दिल आहे.अलिबागमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांच्या जागेवर भाजपचे छोटम शेठ यांनी दावा केला असला तरी येथेही छोटम शेठ अर्थात दिलीप भोईर यांची डाळ शिजणार नाही.तर महाडचे आमदार भरत गोगावले यांना महायुती मधून तसा कोणी प्रतिस्पर्धी नसला तरी महाविकास आघाडीच्या स्नेहल जगताप यांचे कडवं आव्हान असणार आहे तर कर्जत विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी दावा केला असला ही जागाही शिंदे गटाला महायुतीतून मिळणार असल्याने प्रबळ दावेदार सुधाकर घारे यांच्याकडे एकतर तिसरी आघाडी किंवा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पर्याय उरला आहे.
जर तिसऱ्या आघाडीतून सुधाकर घारे यांना तिकीट मिळाल्यास तिरंगी लढत कर्जत मतदार संघात होईल.तशात भाजपचे किरण ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.अन्यथा महायुती विरुध्द महाविकास आघाडी विरुध्द तिसरी आघाडी असा रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे.प्रत्येक पक्षात पक्षप्रवेश आरोप प्रत्यारोप यांच्या रंगीत तालीम तशा सुरू झाल्या आहेत त्या फक्त तिकीट वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत नंतर या रंगीत तालमी वेग घेतील.
दरम्यान भरत गोगावले यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना रायगडात शिंदे गटाच्या तीन जागा असतील असे स्पष्ट केल्याने कर्जतची जागा ही शिंदे गटाला मिळेल हे स्पष्ट झालं आहे