आदिती तटकरे या महेंद्र थोरवे यांच्यावर भडकल्या,काठावर वाचलेत त्यांना फारसे महत्त्व देत नाही.
संतोष दळवी - कर्जत
कर्जत मतदार संघात आपला विजय हा सुनील तटकरेंचा पराभव आहे अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली होती त्यावर आमदार आदिती तटकरे यांनी सणसणीत टोला दिला आहे त्या रोह्यात पत्रकारांशी बोलल्या.बऱ्याचदा आमदार महेंद्र थोरवे यांनी पालक मंत्री असताना आदिती तटकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली मात्र आदिती तटकरेंनी त्यावर कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र आज त्यांनी रोह्यात आमदार थोरवे यांचा चांगलाच समाचार घेतला.
एका स्थानिक युटुब वृत्तवाहिनीला दिलेल्या थोरवे यांच्या प्रतिक्रियेनंतर त्या प्रथमच भडकल्या,त्या म्हणाल्या," मी महेंद्र थोरवे यांना फारसे महत्त्व देत नाही.काठावर वाचलेत त्यांनी त्यांचा मतदार संघ पहावा.कोणाला यश मिळालं तर त्याची डोक्यात हवा जाऊ देऊ नये.उलट त्याचा नम्रतेने स्वीकार करावा.मी 82 ते 83 हजार मताधिक्याने निवडून आली त्याबद्दल महायुतीच्या नेत्यांचे आभार मानते.कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवतील हे स्थानिक आमदार ठरवत नाही असा उपरोधिक सल्ला देऊन तटकरे पुढे म्हणाल्या,तुम्ही काठावर वाचलात जरा इकडे तिकडे झाले असते तर तुमची जागा दिसून आली असती असा टोला हाणायला त्या विसरल्या नाहीत.
नवनिर्वाचित आमदार आदिती तटकरेंनी रोह्यात या दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडाली असून आमदार महेंद्र थोरवे यावर काय प्रतिक्रिया देतात हे पहावं लागेल.